माणगाव न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय
| माणगाव | प्रतिनिधी |
बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या रागातून भावाने एकाच खून केल्याची घटना माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या घटनेनंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला माणगाव येथे अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरु होता. वकिलांचा युक्तिवाद, साक्ष आणि पुरावेग्राह्य धरत न्यालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संत निरंकारी सत्संग भवनच्या समोर 11 ऑगस्ट 2018 रोजी सायंकाळी 9.30 च्या सुमारास ही घडली होती.
थोडक्यात हकीकत अशी की, आरोपी सौरभ उर्फ बेंडया हरिश्चंद्र सावंत याने यातील मयत विशाल उर्फ बाळू उर्फ भीम श्रीपत जुमारे याच्यासोबत त्याच्या बहीणीचे प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंधाबाबत आरोपीस समजल्यामुळे आरोपी सौरभ सावंत याने संध्याकाळी 9.30 चे सुमारास खरवली, ता. माणगाव येथील संत निरंकारी हॉलमध्ये मयत विशाल जुमारे हा मित्रांसोबत बसलेला होता. थोड्या वेळाने तेथे आरोपी सौरभ सावंत हा मयत विशाल जुमारे यास ठार मारण्याच्या उद्देशाने खिशामध्ये चाकू घेऊन आला. तसेच त्याने विशालला मारहाण करण्यास सुरूवात केली.
या गुन्ह्यातील फिर्यादी दिनेश आडीत, संकेत आडीत, कल्पेश आडित, श्रीकांत तांबट, नथूराम दसवते हे होते. आरोपीविरूध्द माणगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास एस.बी. गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक माणगाव पोलीस ठाणे यांनी करून मा. न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. या खटल्यामध्ये अति. शासकीय अभियोक्ता, जितेंद्र डी. म्हात्रे यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पाहिले. फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व वैद्यकीय अधिकारी, तपासी अंमलदार यांची साक्ष महत्वाची ठरली. या प्रकरणात आरोपी सौरभ उर्फ बेंडया हरिश्चंद्र सावंत यांस मा. अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.टी. भालेराव यांनी दोषी ठरवून जन्मठेप व 3000 रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सदर खटल्याचे कामकाजात पैरवी अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचे महत्वाचे सहकार्य लाभले.






