मुरुड | वार्ताहर |
मुरुड तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण वाढत चालले आहेत दररोज 45 ते 50 या संख्येत रुग्णवाढ होत आहेत.या पार्श्वभूमीवर आता प्रशासनकडून कडक निर्बंध अवलंबिले जात आहेत.मुरुडमध्ये बाहेरहून येणार्या प्रत्येकाची आता सीमेवरच तपासणी केली जात आहे.शिवाय शहरात विनामास्क फिरणार्या नागरिकांवरही दंडात्मक कारवाई केली जात आहे.
कोरोना संसर्गावर आळा घालण्यासाठी नुकत्याच आयोजित केलेल्या नियोजन बैठकीत प्रशासनाला कडक निर्बंध घालण्याचे आदेश नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी दिले होते.बैठकीत ठरल्याप्रमाणे प्रशासन सतर्क झाले असून संचारबंदीमध्ये विनाकारण फिरणार्या नागरिकांची अँटिजेन्ट चाचणी घेण्यात येत आहे व त्यामध्ये पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्यास त्याच रवानगी कोविड सेंटरमध्ये करण्यात येत आहे, रुग्णसंख्येत रायगड जिल्हा चौथ्या टप्प्यात येत असल्याने लॉकडाऊनचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत त्याप्रमाणे मुरुड मधील नगरपरिषद प्रशासन व पोलीस यांच्यामार्फत शनिवार व रविवारी विकेंड लॉकडाऊन कडक पाळला जात असून नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार गोविंद कोटंबे स्वतः मार्केटमध्ये आपल्या टीम सह फिरून कारवाई करीत आहेत.मुरुड मधील तिन्ही प्रवेश नाक्यावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवला असून येणार्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे , शुक्रवारी सायंकाळी पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली समुद्रावर फिरण्यासाठी आलेल्या सुमारे 25 ते 30 स्थानिक नागरिकांवर पोलीस ठाण्यात नेऊन कारवाई करण्यात आली, मुरुड तालुक्यात कोरोना संसर्ग वाढत असूनही अजून काही नागरिकांमध्ये जनजागृतीचा अभाव आहे , तसेच काही लोक खोटी कारणे सांगून विनाकारण फिरण्याचा प्रयत्न करीत असल्याचे प्रवेश नाक्यावर बंदोबस्तास असलेले पोलीस सचिन वाणी यांनी सांगितले .