जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
विषारी सापाच्या दंशामुळे 26 वर्षीय तरुण मृत्यूशी झुंज देत होता. मात्र अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने तो मृत्यूच्या दारातून परतला. कित्येक तासांच्या उपचारानंतर तो बरा झाला असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर थळे असे या तरुणाचे नाव आहे. हा तरुण मुळचा पेणमधील रहिवासी आहे. नोकरी व्यावसायानिमित्त तो रोहा येथे राहत आहे. मागील पंधरा दिवसांपूर्वी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्याला मन्यार नावाच्या विषारी सापाने दंश केला होता. ही बाब तेथील स्थानिकाच्या लक्षात आल्यावर त्याला अधिक उपचारासाठी अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. तरुणाची प्रकृती गंभीर होती. त्याला याला तातडीने अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सापाच्या विषाचा प्रभाव त्याच्या शरीरावर झाला होता. श्वास घेणेदेखील त्याला कठीण झाले हेोते. अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर तो होता. तो मृत्यूशी झुंज देत होता. जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निशीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार तातडीने उपचारामध्ये वेग घेण्यात आला. अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. किरण वाघमारे, डॉ. वैभव पाटील, डॉ. किशोर सागपेल्लीवार यांनी प्रचंड मेहनत घेऊन त्याला मृत्यूच्या दारातून परत आणले. त्याची प्रकृती स्थीर झाली. मेडिसीन विभागाचे डॉ. धनंजय मानटे, अक्षय बंबटकर, डॉ. श्रीया पाटील व अति दक्षता विभागातील कर्मचारी यांच्या प्रयत्नामुळे त्या तरुणाला नवसंजीवनी मिळाली. तो सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कित्येक तासांच्या प्रयत्नाबरोबरच उपचारानंतर तरुणाला वाचविण्यास डॉक्टरांना यश आले.





