गावांसह वाड्या-वस्त्यांमध्ये भक्तिमय वातावरण; ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकांचा जल्लोष
| म्हसळा | महेश पवार |
म्हसळा तालुक्यात गणरायाच्या आगमनाने निर्माण झालेल्या भक्तिमय आणि उत्साही वातावरणाला शनिवारी (दि.19) भावपूर्ण निरोपाची किनार लाभली. तालुक्यातील 83 गावांसह ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्या आणि म्हसळा शहरात घरोघरी विराजमान झालेल्या बाप्पांसह गौराईला भक्तिभावाने निरोप देण्यात आला. यावेळी ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वाद्यांचा निनाद, गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष आणि पावसाच्या सरी अशा उत्साही वातावरणात विसर्जन सोहळा रंगला.
गणेशोत्सवाच्या काळात म्हसळा तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्याचबरोबर घराघरांत गौराईचे आगमन झाल्याने उत्सवाला विशेष चैतन्य प्राप्त झाले होते. यंदा मुंबईकर चाकरमान्यांचीही मोठी गर्दी पाहायला मिळाली. आपल्या गावी कुटुंबीयांसोबत गणेशोत्सव साजरा केल्यानंतर बाप्पांना निरोप देताना अनेकांच्या डोळ्यांत भावुकता, तर मनात पुढील वर्षीच्या आगमनाची ओढ दिसून आली. यावेळी ग्रामीण भागांसह म्हसळा शहरातील विसर्जन मिरवणुकांमध्ये ढोल-ताशांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला. महिला वर्गाने पारंपरिक उत्साहात सहभाग घेतला, तर लहान बाळगोपाळांसह भाविकांनीही विसर्जन घाटांवर मोठ्या संख्येने हजेरी लावली मेघराजानेही बाप्पांना निरोप देण्यासाठी हजेरी लावल्याने विसर्जन सोहळ्याला निसर्गाची साथ लाभली. पावसाच्या सरी, भक्तिमय वातावरण आणि ढोल-ताशांच्या निनादात गणरायाला निरोप देताना सर्वत्र उत्साहाचे चित्र पाहायला मिळाले.
यादरम्यान, म्हसळ्यात गौरी-गणपतींच्या विसर्जनासाठी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुपारी 3.00 वाजल्यापासून ते रात्री उशीरापर्यंत गौरी-गणपतींचे विसर्जन सुरू होते. त्यामुळे सर्वच ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच, यंदा गणेशोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सामाजिक एकोपा, परंपरा आणि भक्तिभावाचे दर्शन घडले. बाप्पांच्या निरोपाने उत्सवाची सांगता होत असली, तरी पुढील वर्षी गणरायाच्या आगमनाची प्रतीक्षा आता सर्वांनाच लागली आहे.
प्रशासनाचे चोख बंदोबस्त
गौरी-गणपती विसर्जनादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस व महसूल प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी योगिता कुटे आणि म्हसळ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विविध गावांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्याचबरोबर तहसीलदार सचिन खाडे, मंडळ अधिकारी आणि महसूल विभागातील कर्मचाऱ्यांनी तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेत विसर्जनाचे नियोजन केले.
विसर्जन घाटांवर मोठी गर्दी
गणरायाला निरोप देण्यासाठी महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक आणि चिमुकल्यांनी विसर्जन घाटांवर गर्दी केली होती. आरती, जयघोष आणि भावपूर्ण वातावरणात बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. गौराईला निरोप देतानाही महिलांनी पारंपरिक श्रद्धा आणि उत्साह जपत सहभाग घेतला.





