। रसायनी । प्रतिनिधी ।
रसायनी परिसरातील दापीवली येथे घरासमोरील ग्रिटच्या पिशव्या बाजूला करण्याच्या कारणावरून दोन गटांत जोरदार वाद होऊन परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या तक्रारीनुसार, महिला तक्रारदार घरात पाणी भरत असताना घरबांधकामासाठी ठेवलेल्या ग्रिटच्या पिशव्यांवरून आरोपींनी वाद घालत शिवीगाळ व धक्काबुक्की केली. तक्रारदार महिलेने मारहाण रोखण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांच्या नाकावर मारून दुखापत केली.
तर दुसऱ्या तक्रारीत, तक्रारदार आपल्या कुटुंबासह कार्यक्रमावरून घरी आल्यानंतर कार पार्क करत असताना पार्किंगमधील ग्रिटच्या पिशव्या बाजूला केल्याचा राग धरून आरोपींनी वाद घालत मारहाण केली. यामध्ये तक्रारदार यांच्या पत्नीला धक्का देऊन खाली पाडल्याने तिच्या पायाला दुखापत झाली. दोन्ही प्रकरणांमध्ये जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याचेही नमूद करण्यात आले असून, रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.






