व्याजी व्यवहार, विमलची जादा दराने विक्री; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील रेवदंडा ही पंचक्रोशीतील मोठी आणि गजबजलेली बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. मात्र, याच रेवदंडा परिसरात अवैध सावकारी, बेकायदा गुटखा विक्री आणि व्याजी व्यवहारांचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. बंदी असतानाही गुटखा आणि विमलसारख्या तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री सुरू असून, त्याची ज्यादा दराने विक्री करून सर्वसामान्यांची आर्थिक लूट केली जात असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
रेवदंडा परिसरातील केळकर स्टॉप, मुख्य बाजारपेठ आणि काही आडमार्गांवर सावकारीचे व्यवहार उघडपणे सुरू असल्याची चर्चा रंगू लागली आहे. “दहा दिले तर वीस परत” अशा पद्धतीने व्याज आकारून गरीब, हातावर पोट भरणारे कामगार, वाहन चालक आणि गरजू नागरिकांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचे बोलले जात आहे. काही ठिकाणी महिलांकडून दमदाटी करत हप्ते वसूल केले जात असल्याचेही आरोप समोर येत आहेत.
एकेकाळी व्यापाराचे प्रमुख केंद्र म्हणून ओळख असलेल्या रेवदंडा बाजारपेठेचा विस्तार वाढत्या नागरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात झाला. पंचक्रोशीतील अनेक गावांमधून नागरिक खरेदीसाठी रेवदंड्यात येतात. या वाढत्या वर्दळीचा फायदा घेत सावकारी आणि बेकायदा धंदे करणाऱ्यांनी येथे आपले जाळे पसरवल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, रायगडच्या पोलीस अधीक्षकपदी आंचल दलाल यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. गुटखा, विमल आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री व वाहतूक रोखण्यासाठी विशेष सूचना देण्यात आल्या होत्या. सुरुवातीच्या काही महिन्यांत पोलिसांनी धडक कारवाया करून अनेक अवैध धंद्यांवर आळा घातला होता. ज्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असल्याचे आढळले, तेथील अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या होत्या. मात्र, आता रेवदंडा परिसरात पुन्हा पोलिसांचा धाक कमी झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. बंदी असलेला गुटखा चोरी छुप्या मार्गाने विकला जात असून, विमल आणि अन्य तंबाखूजन्य पदार्थ 35 ते 40 रुपयांपर्यंत ज्यादा दराने विकले जात असल्याचा आरोप होत आहे. काही दुकाने आणि आडोशाला सुरू असलेले हे प्रकार आता उघड गुपित बनले असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या वाढत्या विक्रीमुळे युवकांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच अशा पदार्थांच्या सेवनामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
रेवदंड्यात वाढत चाललेल्या अवैध सावकारी, दमदाटी करून होणारी वसुली आणि बेकायदा गुटखा विक्रीविरोधात पोलीस प्रशासन, अन्न व औषध प्रशासन तसेच स्थानिक यंत्रणांनी संयुक्त मोहीम राबवून कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.





