अविनाश कदम यांची शिक्षण क्षेत्रासाठी मदत
| वावोशी | प्रतिनिधी |
ग्रुप ग्रामपंचायत जांभिवलीचे माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते अविनाश कदम यांनी आपला मुलगा आयुष कदम यांच्या वाढदिवसानिमित्त जांभिवली येथील जिल्हा परिषद शाळेला एलईडी स्मार्ट टीव्ही भेट देऊन शिक्षण क्षेत्राप्रती असलेली आपली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाचा अधिक प्रभावी लाभ मिळणार असून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेतही भर पडणार आहे. या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती, पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी अविनाश कदम यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
अविनाश कदम यांनी केवळ जांभिवली शाळेलाच नव्हे तर खालापूर तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांना विविध शैक्षणिक साहित्य भेट देऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या माध्यमातून तुरमाळा, दुरसेत, खालचे उंबरे, झाडाणी, गारमाळ गोहे, आत्तकरगाव, गोठीवली, परखंदे आणि गारमाळ येथील जिल्हा परिषद शाळांना प्रिंटर भेट देण्यात आले आहेत. तसेच जांभिवली, रानसई आणि वावोशी फाटा येथील शाळांना एलईडी टीव्ही प्रदान करण्यात आले आहेत. याशिवाय जांभिवली वाडी येथील शाळेसाठी पत्र्याचे शेड उभारणे, टेबल उपलब्ध करून देणे तसेच दरवर्षी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करणे असे विविध उपक्रमही त्यांनी राबविले आहेत. त्यांच्या या कार्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध होण्यास मोठी मदत झाली आहे.
शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी सातत्याने योगदान देणाऱ्या अविनाश कदम यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.







