| नवी मुंबई | प्रतिनिधी |
सुदाम लोटन चव्हाण (57), सहाय्यक अधीक्षक व शाखा अधिकारी, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई विभागीय कार्यालय, वाशी, नवी मुंबई यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
तक्रारदार हे खासगी शिक्षक (जिनियस लर्निंग सेंटर) असून, त्यांच्या विद्यार्थ्यास ‘अध्ययन अक्षमता’ असल्याने फेब्रुवारी 2026 च्या एस.एस.सी. परीक्षेसाठी लेखनिक (रायटर) मिळावा यासाठी अर्ज करण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या आईने तक्रारदार यांना अधिकृत पत्र देऊन पुढील कार्यवाही करण्यास सांगितले होते. सदर लोकसेवकाने विद्यार्थ्यास लेखनिक देणे तसेच परीक्षेचे विषय बदलून देण्यासाठी रु. 10,000/- रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारीनंतर पडताळणीत मागणी सिद्ध झाली. तडजोडीनंतर रु. 8,000/- स्वीकारण्याचे मान्य करण्यात आले. शुक्रवार, दि. 13 फेब्रुवारी रोजी सापळा रचून शासकीय पंचासमक्ष आरोपीने रु. 8,000/- (रु. 500 च्या 16 नोटा) स्वीकारताच दुपारी 12.46 वा. त्यास रंगेहाथ पकडण्यात आले. पुढील गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरू आहे. ही कारवाई धर्मराज सोनके, पोलीस उपअधीक्षक, नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.





