सफाई कामगारांच्या आंदोलनाचा आठवा दिवस
संपूर्ण शहराचे आरोग्य धोक्यात
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
स्वच्छतेचा वसा घेतलेल्या हातांना उपासमारीच्या दरीत लोटणाऱ्या श्रीवर्धन नगरपरिषद प्रशासनाचा क्रूर चेहरा आता पूर्णपणे उघडा पडला आहे. कंत्राटी सफाई कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा गुरूवारी (दि.9) सलग 8 वा दिवस असून, प्रशासनाच्या आणि ठेकेदाराच्या आडमुठ्या धोरणामुळे संपूर्ण शहराचे आरोग्य आता धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे, या आंदोलनाला आता सर्वपक्षीय पाठिंबामिळाल्याने हे आंदोलन प्रशासनाविरुद्धच्या जनआक्रोशात रूपांतरित झाले आहे.
काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये सुप्रिया चोगले यांनी या सफाई कामगारांच्या पिळवणुकीचा मुद्दा अत्यंत प्रभावीपणे मांडला होता. कंत्राटदार कशाप्रकारे 627 रुपयांऐजी केवळ 333 रुपये देऊन कामगारांचे शोषण करत आहे, याचा पर्दाफाश त्यांनी केला होता. त्यांच्या त्या भूमिकेचे संपूर्ण स्तरातून कौतुक होत असून, त्यांनी पेटवलेली ही ठिणगी आता वणवा बनली आहे. कंत्राटी सफाई कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी श्रीवर्धन नगरपरिषद प्रशासनाच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आले आहे. गेल्या आठ दिवसांपासून एकही घंटागाडी फिरली नसल्याने श्रीवर्धनमधील गल्लीबोळांत कचऱ्याचे डोंगर साचले आहेत. कुजणाऱ्या कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाच्या आणि कंत्राटदाराच्या पैशाच्या हव्यासापोटी सामान्य जनतेला का वेठीस धरले जात आहे? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
दरम्यान, या ठिय्या आंदोलनात कामगारांच्या या लढ्याला धार देण्यासाठी श्रीवर्धनमधील मातब्बर राजकीय नेते रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी भेट देऊन आपले जाहीर निवेदन सादर केले आणि कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच, प्रशासकीय भ्रष्टाचारावर कडाडून टीका देखील केली आहे. या सर्व पक्षीय नेत्यांच्या सहभागामुळे आता हे आंदोलन केवळ कामगारांचे न राहता श्रीवर्धनच्या स्वाभिमानाची लढाई बनले आहे.
आंदोलनाचा आठवा दिवस उजाडला तरी प्रशासन आणि ठेकेदाराला अद्याप पाझर फुटलेला नाही. वातानुकूलित केबिनमध्ये बसून फाईलींवर सह्या करणाऱ्या अधिकाऱ्यांना कडाड्याच्या उन्हात रस्त्यावर बसलेल्या कामगारांच्या घामाची आणि त्यांच्या भुकेलेल्या पोरांची किंमत उरलेली नाही. स्वतःच्या तिजोऱ्या भरण्यासाठी गरिबांच्या ताटातील घास पळवणारा ठेकेदार आणि त्याला मूक संमती देणारे अधिकारी यांच्यातील अर्थपूर्ण संबंधांमुळेच आजही तोडगा निघालेला नाही. ज्या हातांनी श्रीवर्धनची सेवा केली, त्या हातांना पगार नाकारणाऱ्या कंत्राटदाराची पाठराखण प्रशासन का करत आहे? जर तातडीने तोडगा निघाला नाही, तर हे आंदोलन नगरपरिषदेच्या मुख्य खुर्चीपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशारा देवेंद्र भुसाणे यांनी दिला आहे. पुढील दोन दिवस श्रीवर्धनसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. जर प्रशासनाने आपला दगड झालेला स्वभाव बदलला नाही आणि ठेकेदाराची मुजोरी मोडीत काढली नाही, तर संपूर्ण शहर या अन्यायाचा फैसला रस्त्यावर उतरून केला जाईल, असे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे.







