| अलिबाग | प्रतिनिधी |
अर्थसंकेत प्रस्तुत महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड 2026 हा प्रतिष्ठित बिझनेस सन्मान सोहळा नुकताच मुंबई येथे पार पडला. 2017 पासून सुरू झालेल्या या उपक्रमामागील उद्दिष्ट म्हणजे मराठी उद्योजकांना ब्रँडिंगचे महत्त्व समजावणे आणि त्यांच्या ब्रँड्सना जागतिक स्तरावर नेण्यास प्रोत्साहन देणे हा आहे. यावेळी खो-गो या ब्रँडची मोस्ट पॉप्युलर ब्रँड म्हणून निवड करण्यात आली. सार्वजनिक मतदान प्रक्रियेतून लोकांनी दिलेल्या पसंतीनुसार हा सन्मान जाहीर करण्यात आला.
मुंबईत आयोजित या भव्य कार्यक्रमात पोस्टकार्ड मॅन ऑफ इंडिया प्रदीप लोखंडे आणि अर्थसंकेतचे संस्थापक डॉ. अमित बागवे यांच्या हस्ते खो-गोचे हेमंत रेडकर यांचा गौरव करण्यात आला. यावेळी उर्वेश रेडकर आणि त्यांचे सहकारी श्रेयस कडुलकर हे देखील उपस्थित होते. यावेळी डॉ. अमित बागवे यांनी, व्यवसायात कृत्रिम बुद्धिमत्तेचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. तसेच, मान्यवरांनी उद्योजकांना ब्रँड बिल्डिंग, आर्थिक शिस्त आणि जागतिक स्तरावर विस्तार याबाबत मार्गदर्शन केले.
खो-गोला मिळालेला हा सन्मान त्यांच्या ग्राहकांमधील विश्वास आणि लोकप्रियतेचा ठसा उमटवणारा ठरला आहे. 1961 मध्ये कै. मुरलीधर रेडकर यांनी मुंबईतील गिरगावमधून खो-गो गोळ्यांचा प्रवास सुरू केला. अतिशय स्वस्त आणि प्रभावी आयुर्वेदिक औषध म्हणून या गोळ्या अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या. खो-गोला घराघरात पोचवण्यात कंपनीचे संचालक हेमंत रेडकर यांचीच कार्यकुशलता व मेहनत आहे. तसेच, खो-गोच्या प्रसिद्धीमध्ये वर्तमानपत्रांतील कल्पक कार्टून जाहिराती आणि एसटी बसवरील जाहिरातींचा मोठा वाटा होता. त्यामुळे हा ब्रँड महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील घराघरांत पोहोचला. साधी वेष्टने आणि गुणकारी परिणाम यामुळे खो-गो आजही खोकल्यावरील एक भरवशाचे नाव मानले जाते. या कंपनीने पिढ्यानपिढ्या आपली गुणवत्ता जपली असून, आयुर्वेदिक परंपरेचा हा वारसा आजही दिमाखात सुरू आहे.







