कुरुळ तलाव ते बेलकडे दरम्यानचे काँक्रिटीकरण थांबवा; जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करावा, नागरिकांचे साकडे
| अलिबाग | प्रतिनिधी |
दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची वाढणारी गर्दी आणि आधीच वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या नागरिकांचा विचार करता कुरुळ तलाव ते बेलकडे फाट्यादरम्यानचे काँक्रिटीकरण दिवाळीनंतरच करावे, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी केली आहे. गतवर्षीच्या वाहतूक कोंडीचा अनुभव पाठीशी असताना पुन्हा तोच त्रास नागरिकांच्या माथी मारू नये. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी तातडीने हस्तक्षेप करून एमएसआयडीसीला काम थांबविण्याचे आदेश द्यावेत, असे साकडे घालण्यात आले आहे.
दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे पुणे, मुंबईसह राज्यभरातून हजारो पर्यटक नागाव, मुरुड आणि अलिबागकडे धाव घेत आहेत. अशा गर्दीच्या काळात कुरुळ ते बेलकडे रस्त्यावर काँक्रिटीकरण सुरू झाल्यास वाहतुकीचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे. अवघ्या अर्ध्या-एक तासाच्या प्रवासासाठी चार-पाच तास वाहतूक कोंडीत अडकण्याची वेळ नागरिक आणि पर्यटकांवर येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून काँक्रिटीकरणाच्या हालचाली सुरू झाल्या असून, साहित्यही रस्त्यालगत आणून ठेवण्यात आले आहे. एकेरी मार्गावरील वाहतुकीचा ताण वाढल्यास वाहतूक पोलिसांसमोरही मोठे आव्हान उभे राहणार आहे.
यापूर्वी अशा कोंडीतून वाद आणि हाणामारीच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे भाऊबीजेपर्यंत काम थांबवून त्यानंतरच सुरू करावे, अशी मागणी होत आहे. कामाच्या काळात रस्त्यावर नियमित पाणी मारून धुळीचा त्रासही रोखावा. एमएसआयडीसीचे अधिकारी स्थानिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून काम पुढे रेटत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.
रस्त्याचे काम भाऊबीज झाल्यानंतरच सुरू करावे. तोपर्यंत धूळ उडू नये म्हणून रस्त्यावर नियमित पाणी मारावे. कुरुळ ते बेलकडे दरम्यान नेहमीच मोठी वाहतूक कोंडी होते. गर्दीच्या दिवसांत काम बंद ठेवल्यास वाहतूक सुरळीत राहील आणि नागरिकांना दिलासा मिळेल. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याकडे तातडीने लक्ष द्यावे.
रुपेश पाटील,
ग्रामस्थ, बेलकडे






