177 कोटींचे काम रखडले; ठेकेदार बदलण्यापासून निधीवाढीपर्यंत निर्णय अधांतरी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग-रोहा रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले असताना आता सार्वजनिक बांधकाम विभागालाही पुढे काय करायचे, यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाची प्रतीक्षा करावी लागत आहे. 177 कोटींचा निधी मंजूर, अनेकदा भूमीपूजने आणि ठेकेदारही निश्चित; मात्र प्रत्यक्षात रस्त्याचे काम अपूर्णच आहे. ठेकेदार बदलायचा की त्यालाच कायम ठेवायचे, निधी वाढवायचा की नाही, यासाठी वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेतले जाणार असल्याचे कार्यकारी अभियंता सांगत आहेत. त्यामुळे अलिबाग-रोहा रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा अनिश्चिततेच्या गर्तेत सापडला आहे.
शेकाप नेते जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून अलिबाग-रोहा मार्गावरील रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली. मात्र, 2023 मध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भाजपकडून भूमीपूजन करण्यात आले. त्यानंतर श्रेयवादातून शिंदेसेनेकडून बेलकडे येथेही भूमीपूजनाचा नारळ फोडण्यात आला. अनेकदा भूमीपूजने होऊनही रस्त्याचे काम मात्र मार्गी लागले नाही.
या कामासाठी 177 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. गुजरातमधील अग्रवाल कंपनीला कामाचा ठेका देण्यात आला. मात्र, कामाला अपेक्षित गती मिळाली नाही. काम परवडत नसल्याचे कारण देत ठेकेदाराने काम बंद केले. परिणामी, गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्याचे काम ठप्प आहे. दरम्यान, सहाण ते कावीरदरम्यान रस्त्याचा काही भाग खचला असून, पावसाळ्यानंतरही त्याच्या दुरुस्तीसाठी ठोस उपाययोजना झालेली नाही. बामणगाव ते वढावदरम्यान रस्त्याची बाजूही खचली आहे. वारंवार दुरुस्ती करूनही हा रस्ता सुरक्षित झालेला नाही. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
ठेकेदाराने काम बंद केल्यानंतर नवीन ठेकेदार नेमण्ो, तसेच 177 कोटींच्या मंजूर निधीत वाढ करण्याच्या मुद्द्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. या दोन्ही बाबींसाठी अधीक्षक अभियंत्यांकडून मार्गदर्शन घेतले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याच्या कामाला आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार, असा प्रश्न अलिबागकर आणि रोहेकरांकडून उपस्थित केला जात आहे.
अलिबाग-रोहा मार्गावरील रस्त्याचा ठेका अग्रवाल यांना देण्यात आला होता. मात्र, आता ठेकेदार काम करीत नाहीत. त्यामुळे ठेकेदार बदलायचा की तोच कायम ठेवायचा, याबाबत वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेतले जाणार आहे. रस्त्याच्या कामाचे सध्याचे अंदाजपत्रक आगामी काळात वाढण्याची शक्यता असून, त्याबाबतही वरिष्ठांशी चर्चा केली जाईल. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
– मोनिका धायतडक, कार्यकारी अभियंता,
सार्वजनिक बांधकाम विभाग






