हजारो लिटर पाणी वाया; ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा फटका
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
उमटे धरणातील मुख्य व्हॉल्व्हच्या दुरुस्तीनंतर गुरुवारी पाणीपुरवठा पूर्ववत होण्याची अपेक्षा असतानाच चौलमधील रस्त्याच्या कामाने नागरिकांच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आणखी भर घातली. तुलाडदेवी येथे रस्त्याच्या खोदकामादरम्यान जेसीबीने मुख्य जलवाहिनीच फोडल्याने हजारो लीटर पाणी वाया गेले. त्यामुळे आधीच सोमवारपासून पाण्याविना असलेल्या 47 गावांतील 64 हजार नागरिकांना आणखी दोन दिवस पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे.
अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातून 47 गावे आणि 33 वाड्यांना पाणीपुरवठा केला जातो. सुडकोलीपासून 12 ग्रामपंचायतींच्या हद्दीतील नागरिक या धरणावर अवलंबून आहेत. धरणातील मुख्य व्हॉल्व्हमध्ये बिघाड झाल्याने सोमवारपासून पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. गुरुवारी दुपारनंतर पुरवठा सुरू होण्याची अपेक्षा होती. मात्र, एमएसआयडीसीमार्फत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात तुलाडदेवी येथे जेसीबीने जलवाहिनी तोडली आणि पाणीपुरवठ्याचा प्रश्न पुन्हा गंभीर झाला.
एकीकडे पावसाने लवकर दडी मारल्याने प्रशासनाकडून पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जात आहे, तर दुसरीकडे रस्त्याच्या कामात जलवाहिनी फोडून हजारो लीटर पाणी वाया घालवले जात आहे. ठेकेदाराच्या या निष्काळजीपणामुळे उमटे धरणावर अवलंबून असलेल्या नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असून, साचलेले पाणी काढण्यासाठी वेळ लागणार असल्याने पाणीपुरवठा आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
मुख्य व्हॉल्व्हच्या दुरुस्तीचे काम गुरुवारी पूर्ण करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे नियोजन होते. मात्र, चौलमधील तुलाडदेवी येथे रस्त्याच्या खोदकामादरम्यान जेसीबीने जलवाहिनी तोडली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले. आता नवीन जलवाहिनी बसविण्याचे काम सुरू असून, शुक्रवारी संध्याकाळपर्यंत पाणीपुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतींनी नागरिकांसाठी पाण्याची पर्यायी व्यवस्था करावी.
– योगेश कदम, उपअभियंता,
ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, अलिबाग






