विविध संस्था, संघटनांकडून महामानवाला अभिवादन
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 26) विविध संस्था, संघटना, शैक्षणिक संस्था आणि शासकीय कार्यालयांमध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना व प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, तर संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून संविधानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने भारतीय संविधान स्वीकारले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्षे, 11 महिने आणि 18 दिवसांच्या अथक परिश्रमातून संविधान निर्मिती केली. या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण म्हणून दरवर्षी 26 नोव्हेंबर संविधान दिन साजरा केला जातो.
यानिमित्त जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये आणि विविध संस्थांमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. अलिबाग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बी.जी. पाटील, प्रा. भगवान लोखंडे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नितीन राऊत, सामाजिक कार्यकर्ते योगेश मगर, किशोर पाटील यांच्यासह समाजक्रांती आघाडी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, संविधान जागर यात्रा समितीचे पदाधिकारी व सभासद, भारतीय बौद्ध महासभा, बौद्धजन पंचायत समितीचे आजी-माजी पदाधिकारी, सभासद, आंबेडकर अनुयायी आणि सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. अलिबागसह पनवेल, रोहा, मुरूड आदी तालुक्यांमध्येही विविध ठिकाणी संविधान दिन साजरा करून संविधानाचे महत्त्व पटवून देण्यात आले.






