भरधाव कारची वृद्ध महिलेला धडक; प्रशासनाविरोधात संताप
। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।
निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या श्रीवर्धनमध्ये पुन्हा एकदा मद्यधुंद पर्यटकाच्या बेजबाबदारपणामुळे एक गंभीर अपघात घडला आहे. समुद्रकिनाऱ्यालगत काजू विकून उदरनिर्वाह करणाऱ्या सुमारे 70 वर्षीय निराधार आदिवासी महिलेला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
सायंकाळच्या सुमारास ही महिला नेहमीप्रमाणे समुद्रकिनाऱ्याजवळ उभी असताना भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की त्या वाहनाच्या पुढील काचेवर आदळल्या. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी माणगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनाचा वेग जास्त होता. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र संतप्त नागरिकांनी पाठलाग करून वाहन अडवले व चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. चालक व त्याच्या सहकाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, मद्यप्राशन केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. रक्तनमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
गेल्या वर्षभरात तालुक्यात घडलेली ही चौथी गंभीर घटना असल्याचे स्थानिकांनी सांगितले. “पर्यटनाच्या नावाखाली बेशिस्तपणा आणि मद्यसंस्कृतीला मोकळीक दिली जात आहे. स्थानिकांचा जीव इतका स्वस्त झाला आहे का?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला. वर्दळीच्या भागात नियमित ब्रेथ ॲनालायझर तपासणी, कडक नाकाबंदी, सीसीटीव्ही यंत्रणेचे सक्रीय निरीक्षण आणि मद्यधुंद वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहीम राबवण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक संघटनांनी दिला आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनाने संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे. या घटनेमुळे श्रीवर्धनमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.







