दुपारी डांबरीकरण केलेला रस्ता रात्री नळजोडणीसाठी फोडला
| श्रीवर्धन | वार्ताहर |
श्रीवर्धन शहरातील आंबेडकर चौक ते गणेश मंदिर या परिसरातील रस्ता अत्यंत खराब झाला होता. नगरपरिषदेने सदर रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी काम सुरू केले होते. त्यानुसार दुपारी या रस्त्याचे एका बाजूचे डांबरीकरण पूर्ण करण्यात आले. मात्र, दुपारी डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर रात्री अकरा वाजता खोदकाम केले आहे. एका धनदांडग्याने घेतलेल्या मालमत्तेला नळजोडणी देण्यासाठी नगरपरिषदेने रात्री अकरा वाजता त्या ठिकाणी खोदकाम करून नवीन रस्त्याचे वाटोळे केले आहे.
श्रीवर्धन शहरातील सावरकर चौक ते डॉक्टर कासिम राऊत चौक तसेच श्रीवर्धन बाजारपेठेतील रस्ते अत्यंत खराब झालेले आहेत. मागील वर्षी श्रीवर्धन शहरातील जलवाहिन्या बदलण्याचे काम सुरू होते. त्यावेळी खोदकाम केल्यामुळे सदर ठेकेदाराने काम केलेल्या ठिकाणी डांबरीकरण केले असले तरी रस्त्यात अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे खड्डे वाचवण्यासाठी दुचाकीस्वार नेहमी चुकीच्या बाजूने गाडी चालवताना पाहायला मिळतात. त्या ठिकाणी नळ जोडणी द्यायची होती तर रस्ता बनवायला थांबवायचे होते. मात्र, असे न करता नव्याने डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर खोदकाम करून नळजोडणी देण्याचे काम नगरपरिषदेने केले आहे. टिळक मार्गावरील या रस्त्याचे काम नगरपरिषदेने तातडीने कोणत्या कारणासाठी घेतले हा देखील औत्सुक्याचा विषय आहे. कारण शहरातील काही भागांमध्ये यापेक्षाही खराब रस्ते असल्याचे पाहायला मिळते. नवीन केलेल्या रस्त्यावर तातडीने खोदकाम झाल्यामुळे शहरातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे