शासनाचा महसूल बुडवून लाखोंची कमाई; बेकायदेशीर टर्फवर कारवाईची मागणी
| पनवेल | ग्रामीण प्रतिनिधी |
पनवेल पालिका हद्दीतील विविध शहरातील सार्वजनिक वापरासाठी राखीव असलेल्या मैदानांवर काही शाळा, महाविद्यालये तसेच खासगी संस्था चालकांकडून बेकायदेशीररीत्या फुटबॉल, क्रिकेट टर्फ उभारून मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पत्रकार मित्र असोसिएशनचे अध्यक्ष केवल महाडिक यांनी महापालिका व सिडको प्रशासनाला पत्र देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या बेकायदेशीर टर्फवर तासागणिक रुपये 1 हजार 500 ते 2 हजार 500 इतके शुल्क आकारले जात असून, दिवसाला 15 हजार ते 25 हजार आणि महिन्याला 5 ते 8 लाखांपर्यंत अवैध कमाई केली जात आहे. सार्वजनिक वापरासाठी राखीव असलेली मैदाने ही स्थानिक मुलं, युवक व खेळाडूंसाठी असताना, त्यावर फी आकारून प्रवेश दिला जात असल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, हे टर्फचालक-मालक हे शासनाला कोणत्याही प्रकारचा महसूल देत नसून शेड उभारण्यासाठी अथवा टर्फ उभारण्यासाठी कोणतीही स्थानिक प्रशासनाची कोणतीही परवानगी घेत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील अनेक खेळाडूंना खेळण्याच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहावे लागत आहे. ‘पैसे द्या आणि खेळा’ ही भूमिका स्थानिक खेळाडूंवर अन्यायकारक असून, सार्वजनिक मालमत्तेचे उघडपणे खाजगीकरण सुरू असल्याचा आरोप देखील यावेळी पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे करण्यात आला आहे.
ही मैदाने व्यवसायासाठी नव्हे, तर स्थानिक खेळाडू घडवण्यासाठी आहेत. पनवेल महापालिका हद्दीतील युवकांना खेळण्यासाठी फी भरावी लागणे ही अत्यंत लाजिरवाणी आणि चिंताजनक बाब आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून सर्व बेकायदेशीर टर्फ हटवावेत, संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि स्थानिक खेळाडूंना मैदानांचा मुक्त व विनामूल्य वापर उपलब्ध करून द्यावा, अशी ठाम मागणी पत्रकार मित्र असोसिएशनने पत्राद्वारे केली आहे. तसेच, 1 महिन्यामध्ये याबाबत ठोस कारवाई न झाल्यास पत्रकार मित्र असोसिशनच्यावतीने स्थानिक खेळाडूंना सोबत घेऊन शहरव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.





