। रसायनी । प्रतिनिधी ।
रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरीवली गावाजवळ सावरोली–सिद्धेश्वरी रोडवर एसटी बस आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा गंभीर दुखापतींमुळे मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे एसटी बस क्रमांक एमएच 20 बीएल 2267 घेऊन वडगाव ते पनवेल या मार्गावर जात होते. यावेळी मयत दुचाकीस्वार सिद्धेश्वरी कॉर्नर ते वाशीवली या दिशेने जात होता. मात्र, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात तसेच हयगयीने व बेदरकारपणे दुचाकी चालविल्याने एसटी बसला अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. तसेच दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. या प्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा पुढील तपास पोलीस हवालदार रोहित शिंदे करीत आहेत.






