| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |
दीपावली सणाला सुरुवात झाली असून, सणाच्या उत्साहाने पनवेलची बाजारपेठ सजली आहे. आज धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती. विशेषतः पनवेलमधील भाजी मार्केट परिसरात सकाळपासूनच खरेदीदारांची वर्दळ पाहायला मिळाली.
धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करण्याला विशेष धार्मिक महत्त्व असल्याने बाजारात विविध प्रकारचे झाडू विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. पारंपरिक झाडूंसह आकर्षक आणि वेगवेगळ्या आकारांचे झाडू खरेदी करण्याकडे महिलांचा कल दिसून आला. दीपावलीच्या सजावटीसाठी रंगीबेरंगी आकाशकंदील, पणत्या, फुले आणि तोरणांनी बाजारपेठ फुलली आहे. घराच्या प्रवेशद्वारापासून ते बाल्कनीपर्यंत सजावट करण्यासाठी नागरिक विविध साहित्य खरेदी करत आहेत. झेंडूच्या फुलांसह विविध फुलांच्या माळांनाही चांगली मागणी आहे. दुकानदारांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानांसमोर विविध वस्तूंची आकर्षक मांडणी केली आहे. कुटुंबासह बाजारात आलेले नागरिक दिवाळीच्या खरेदीचा आनंद घेताना दिसत आहेत.






