| रायगड | खास प्रतिनिधी |
जिल्ह्यातील सुधागड पंचायत समितीला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांच्या हस्ते पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अधिकारी लता मोहिते यांना गुरुवारी (दि.27) आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. विशेष म्हणजे, आयएसओ मानांकन मिळवणारी सुधागड पंचायत समिती रायगड जिल्ह्यातील पहिली पंचायत समिती ठरली आहे.
शासन व्यवहारात पारदर्शकता तसेच गतिमानता यावी यासाठी ई-गव्हर्नन्सचा वापर केला जात आहे. ग्रामपंचायतीमधील विविध रजिस्टर्स, फॉर्मस, दस्ताऐवजांचे संगणकीकरण करून पेपरलेस ग्रामपंचायतींकडे वाटचाल सुरू आहे. बदलत्या परिस्थितीत ग्रामपंचायतींची कार्यपद्धतीचे पुनर्विलोकन करून व्यवसाय प्रक्रिया पुनर्निर्मिती करण्याची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रशासकीय कामकाज कार्यक्षम व्हावे आणि कार्यपद्धतीत गुणात्मक सुधारणा करण्यासाठी आयएसओ प्रमाणिकीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने 2019 मध्ये घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पंचायत समिती व ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन मिळावे, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. सुधागड पंचायत समितीन प्रशासनाने कार्यालयाचे सुशोभीकरण, पंचायत समितीचे रेकॉर्ड अद्ययावत ठेवणे, तालुक्यातील ग्रामपंचायतींचे नियोजन, सभेत नियमित विषयांवर चर्चा, वृक्षारोपण करणे यासह शासकीय योजना राबविण्यावर भर दिला आहे.
जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणार्या पंचायत समिती व ग्रामपंचायतीना आयएसओ करण्यासाठी व्हि.एन.टेक्नो. रिसर्च प्रा.लि. कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांच्या हस्ते पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी अधिकारी लता मोहिते यांनी आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी अविनाश घरत, तालुका कृषी अधिकारी मिलिंद चौधरी, विस्तार अधिकारी सुनील आहेर, सहाय्यक प्रशासन अधिकारी राजन थळे उपस्थित होते.