। अलिबाग । प्रतिनिधी।
वरसोली हे मासेमारीसाठी एक प्रमुख बंदर आहे; मात्र बंदरात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने ओहोटीच्या वेळी मासेमारी नौका बंदरात आणता येत नाहीत. मच्छिमारांची गैरसोय लक्षात घेऊन, मेरिटाइम बोर्डाने 80 कोटी रुपये खर्चून नव्या ग्रोयेन्स बंधार्याचे काम सुरू केले आहे. दोन्ही बाजूला 500 मीटर लांबीचा बंधारा आणि त्यामधून होड्या जाण्यासाठी गाळ काढण्यात येणार आहे.वरसोली आणि चालमळादरम्यान खाडीभागात समांतर असणारे 500 मीटर लांबीचे दोन बंधारे बांधले जाणार आहेत.
चाळमळा गावातील एका बंधार्याचे 40 टक्के काम अंतिम टप्प्यात असून काम पूर्ण झाल्यावर वरसोली येथील 150 मच्छिमारांना फायदा होणार आहे. सध्या बंदरात एक हजार मेट्रिक टन मत्स्य उत्पादन केले जाते. भविष्यात हा बंधारा मांडवा, अलिबाग, आक्षी, नागाव येथील मच्छिमारांनाही फायद्याचा होईल.बंदरात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. समुद्रात समांतर बंधारे बांधून झाल्यानंतर त्यातील गाळ काढला जाणार आहे. त्यामुळे ओहोटीच्या वेळेस कमी पाणी असतानाही मच्छीमारांना आपल्या होड्या बंदरापर्यंत आणणे सहज शक्य होणार आहेत. यापूर्वी साताड बंदरात अशा प्रकारचा बंधारा बांधण्यात आला असून येथील मच्छिमारांना त्याचा चांगला उपयोग होतो. त्यामुळे वरसोली येथेही अशा प्रकारचा बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी येथील मच्छिमारांची होती.
ऑक्टोबरपासून बंधार्याचे काम सुरू करण्यात आले आहे. चाळमळा बाजूच्या बंधार्याचे काम वेगात सुरू आहे. पुणे येथील सागरी अभियांत्रिकी कामाचा आराखडा तयार करणार्या सीडब्ल्यूपीआरएस या संस्थेने वरसोली येथील ग्रोयेन्स बंधार्याचा आराखडा तयार केला आहे. भूभागापासून 500 मीटर समुद्रात दोन्ही बंधार्यांचे बांधकाम केले जाणार आहे. समुद्राच्या लाटांमुळे बंधार्याचे दगड ढासळू नयेत, यासाठी दोन, चार आणि सहा टनाच्या ट्रेटापॉडचे संरक्षण दिले जाणार आहे. ट्रेटापॉड बनवण्याचे काम चालमळा येथे सध्या सुरू असून साधारण दोन हजार ट्रेटापॉड्स बंधार्याच्या बाजूने लावले जाणार आहेत.
बंदरात नांगरून ठेवलेल्या मच्छीमारांच्या होड्यांचे समुद्राच्या लाटांपासून संरक्षण व्हावे म्हणून यापूर्वी बंधारा बांधण्यात आला होता. या जुन्या बंधार्याची पडझड झाली आहे. होड्यांच्या वाढत्या संख्येमुळे, बंदरातील जागा कमी पडते. त्यामुळे येथे जास्त लांबीचा आणि ओहोटीदरम्यान होड्यांची सहज वाहतूक करण्यास उपयुक्त ठरणार्या बंधार्याची मागणी 2012 पासून मत्स्यव्यवसाय विभागाकडे केली जात होती; परंतु काही कारणास्तव ती पूर्ण झाली नव्हती.
मच्छिमारांना ओहोटीदरम्यान होड्या बंदरात आणता याव्यात, यासाठी दोन समांतर बंधारे बांधले जात आहेत. दोन बंधार्यांमधील गाळ काढल्यानंतर होड्यांना जाण्यासाठी पुरेसे पाणी यात असणार आहे, अशी रचना केली जात आहे. चालमळा बाजूच्या बंधार्याचे काम वेगाने सुरू असून लवकरच वरसोली बाजूच्या बंधार्याचेही काम सुरू करण्यात येईल.
प्रवीण पाटील,
उपअभियंता, मेरिटाइम बोर्ड.