| रसायनी | प्रतिनिधी |
रसायनी हद्दीतील आपटा-सोनारवाडी मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धोकादायक खड्डे पडल्याने प्रवासी, वाहनचालक आणि नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावरील मोठे खड्डे आणि खराब झालेली अवस्था यामुळे चारचाकी तसेच अवजड वाहनांची वाहतूक अत्यंत कठीण झाली आहे. दरम्यान, रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजविण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
विशेषतः रात्री-अपरात्री वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास रुग्णवाहिका किंवा इतर आपत्कालीन वाहने गावात पोहोचण्यास मोठा अडथळा निर्माण होत असल्याची चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार घसरून लहान-मोठे अपघात होण्याची शक्यता वाढली असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या रस्त्यावर अपुरा प्रकाश असल्याने रात्रीच्या वेळी खड्डे स्पष्ट दिसत नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना अंदाज न आल्याने अपघाताचा धोका अधिक वाढत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सोनारवाडी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे रस्त्याची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून मोठे व धोकादायक खड्डे त्वरित बुजविण्याची मागणी केली आहे. तसेच रस्त्याची आवश्यक ती कायमस्वरूपी दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.







