स्पर्धेपेक्षा लोकांचा जीव मोलाचा

| जयपूर | वृत्तसंस्था |

आयपीएल पुढे ढकलणे निराशाजनक आहे, परंतु कोरोनापासून लोकांना वाचवणे हे प्रथम प्राधान्य असले पाहिजे, असे प्रांजळ मत राजस्थान रॉयल्सचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसने  याने व्यक्त केले आहे. आयपीएल 2021 स्पर्धा पुढे ढकलल्यानंतर  त्याने ही  मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

मॉरिसने बीसीसीआयच्या या निर्णयाचे समर्थन केले असून यावेळी प्रत्येकाने कोरोनाला पूर्णपणे पराभूत करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे मॉरिसने सांगितले आहे.  राजस्थान रॉयल्सच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये टीमच्या खेळाडूंनी आयपीएल पुढे ढकलल्यानंतर प्रतिक्रिया दिली.  कोरोना विषाणूमुळे आयपीएलचा 14वा हंगाम पुढे ढकलण्यात आला. अनेक खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर, बीसीसीआयने आयपीएलचे आयोजन थांबवण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा आणि सनरायझर्स हैदराबादचा यष्टिरक्षक फलंदाज वृध्दिमान साहा करोना पॉझिटिव्ह आढळले आणि त्यानंतर आयपीएल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आयपीएल थांबवणे निराशाजनक आहे, पण ती गोष्ट घडली आहे. याक्षणी अनेक लोक समस्यांशी झगडत आहेत आणि बहुधा हा योग्य निर्णय आहे. कोरोनाचा पराभव केला पाहिजे कारण या क्षणी ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. 

ख्रिस मॉरिस,क्रिकेटर

आयपीएल पुन्हा सुरू करता येईल

मॉरिस म्हणाला, चांगली गोष्ट म्हणजे आपण उर्वरित स्पर्धा नंतर करू. त्यामुळे आत्ताचा हा निर्णय योग्य आहे. शक्यतो घरी राहा. एकदा करोना गेला तर आपण पुन्हा आयपीएलमध्ये खेळू. मॉरिस हा यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणारा सर्वात महागडा खेळाडू होता. त्याला 16.25 कोटींची बोली लावत राजस्थानने संघात दाखल केले होते.

Exit mobile version