हर्‍याचीवाडीत भीषण पाणीटंचाई

ग्रामस्थांवर डोंगर उतरून पाणी नेण्याची वेळ; खासगी बोअरवेलचा आधार

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायतीमधील हर्‍याचीवाडीमधील 35 घरांवर पाणीटंचाईचे संकट सुरू आहे. तेथील पिण्याचे पाण्याचे सर्व स्त्रोत निष्फळ ठरल्याने स्थानिक ग्रामस्थांवर वाडीच्या पायथ्याशी जाऊन पाण्याने भरलेले हंडे डोक्यावरून वाहून नेण्याची वेळ आली आहे. स्थानिक आदिवासी लोक वाडीच्या पायथ्याशी असलेल्या विहिरीचे पाणी तसेच खासगी बोअरवेलचे पाणी आणून तहान भागवत आहेत.

वारे ग्रामपंचायतीमधील हर्‍याचीवाडीमध्ये 35 घरांची वस्ती आहे. या ग्रामपंचायतीमधील जांभुळवाडी, नवसूचीवाडी आणि हर्‍याचीवाडी या तीन आदिवासी वाड्या या दुर्गम भागात वसल्या आहेत. त्या आदिवासीवाड्यांचे पाण्याचे उद्भव क्षेत्र हे प्रामुख्याने डोंगराच्या पायथ्याशी असून, तेथे विहिरी खोदल्या आहेत. त्या विहिरींमध्ये चांगला पाणीसाठा आहे, पण तेथून वाडीपर्यंत पाणी डोक्यावर वाहून न्यावे लागत असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाण्याची टंचाई या वाडीमध्ये राहणार्‍या आदिवासी लोकांनी एप्रिल महिन्यात अनुभवली असून, आता त्या पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले आहे.वाडीसाठी खोदण्यात आलेल्या विहिरीला चांगले पाणी आजही आहे, मात्र ते पाणी वाडीपर्यंत नेण्याची व्यवस्था फेल गेली आहे.

वाडी मधील 35 घरांच्या वस्तीसाठी येथे प्लास्टिक टाकी बसवली आहे. मात्र, तेथपर्यंत पाणी पोहोचत नसल्याने स्थानिक आदिवासी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याच्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सकाळी नऊ वाजेपर्यंत स्थानिक आदिवासी महिला आपल्या मुलाबाळांना घेऊन पाणी आणण्यासाठी पायपीट करीत असतात. तर, संध्याकाळी पाचनंतर पुन्हा एकदा अशीच स्थिती या वाडीमध्ये दिसून येते.

सध्या लग्नसराई सुरू असून, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी खासगी टँकर मागवावा लागत आहे. तर, डोंगर चढून पाणी आणावे लागत असल्याने महिलांची होणारी दमछाक लक्षात घेऊन काही ग्रामस्थ आठ दिवसांनी पैसे गोळा करतात आणि पाण्याचा टँकर मागवून पिण्याच्या पाण्याची तहान भागवतात. त्याच भागात एका बांधकाम व्यावसायिक यांच्याकडे असलेल्या बोअरवेलला चांगले पाणी लागले आहे. त्या बोअरवेलमधून ग्रामस्थांना पिण्याचे पाणी दिले जात असते. मात्र, असे असताना वारे ग्रामपंचायत आणि कर्जत पंचायत समिती यांचे अजिबात लक्ष वाडीमधील पाणीटंचाईकडे नाही असे दिसून येत आहे. ग्रामस्थांवर ओढवलेल्या या पाणी संकटाबद्दल कोणालाही सोयरसुतक नाही असे दिसून येत आहे. त्यामुळे आदिवासी ग्रामस्थ संतप्त असून, आम्ही साधे पिण्याचे पाणी देत नसलेल्या सरकारी यंत्रणेवर आपला संताप व्यक्त केला.

Exit mobile version