1 कोटी लाभार्थीची दुसर्‍या मात्रेकडे पाठ

। मुंबई । वृत्तसंस्था ।
राज्यात झालेल्या एकूण लसीकरणापैकी 44 टक्के लसीकरण मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये झाले आहे, तर सुमारे एक कोटी नागरिकांची दुसर्‍या मात्रेची नियोजित वेळ उलटून गेली तरी अद्याप ते लसीकरणासाठी आलेले नाहीत.
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात लसीकरण वेगाने होत आहे. असे असले तरी राज्यातील पाच जिल्ह्यांमध्येच बहुतांश लसीकरण आहे. 24 नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार राज्यात एकूण 10 कोटी 92 लाख लसीकरण झाले. यातील सर्वाधिक चार कोटी 81 लाख लसीकरण मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये झाले आहे. सर्वाधिक म्हणजे 15 टक्के लसीकरण मुंबईत, तर त्याखालोखाल पुणे (12 टक्के), ठाणे (आठ टक्के), नाशिक (पाच टक्के) आणि नागपूरमध्ये (पाच टक्के) झाले आहे.राज्यात एक कोटी नागरिकांची दुसर्‍या मात्रेची वेळ उलटून गेली आहे. मात्र ते दुसरी मात्रा घेण्यासाठी आलेले नाहीत. यात 84 लाख नागरिक कोविशिल्ड, तर 14 लाख कोव्हॅक्सिन लस घेणारे आहेत, असे आरोग्य आयुक्तालयाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितले.
या जिल्ह्यांमध्ये लसीकरण सर्वात कमी
नंदुरबारमध्ये सर्वात कमी लसीकरण झाले असून पहिल्या मात्रेचे 59 टक्के, तर दुसर्‍या मात्रेचे 29 टक्के लसीकरण झाले आहे. यासह बीड, नांदेड, अकोला, यवतमाळ, लातूर आणि हिगोली या जिल्ह्यांमध्ये तुलनेने कमी लसीकरण झाले आहे.

Exit mobile version