| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील अलिबागसह श्रीवर्धन, उरण, मुरूड तालुक्यातील विविध विकासकामांना आता गती मिळणार आहे. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी प्रादेशिक पर्यटन व विकास योजनेंतर्गत उपलब्ध करण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन व उरण ही पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे तालुके म्हणून ओळखले जातात. वेगवेगळ्या धार्मिक स्थळांसह पर्यटनाच्या दृष्टीने हे तालुके नावारुपाला आले आहेत. दरवर्षी लाखो पर्यटक जिल्ह्यात येतात. यातून पर्यटनवाढीला चालना मिळत आहे. पर्यटनाबरोबरच येथील गावे, वाड्यांच्या विकासासाठी आ. जयंत पाटील यांच्या प्रयत्नाने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून गावांतील रस्ते, मंदिरे बांधण्याबरोबरच वेगवेगळ्या परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. या विकासकामांमुळे गावांबरोबरच परिसरातील पर्यटन स्थळांमध्ये पर्यटनवाढीला गती मिळण्यास मदत होणार आहे. पारंपरिक पर्यटनाबरोबरच विकासकामांमुळे गावांतील वेगळ्या पर्यटनाची अनुभूती यातून पर्यटकांना मिळणार आहे. पर्यटनवाढीमुळे स्थानिकांना रोजगाराचे साधन खुले होणार आहे. यातून गावांची व धार्मिक स्थळे, समुद्रकिनारे यांची एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे.
तालुक्यात होणारी विकासकामे उरण : आवरे येथील विठ्ठल रखुमाई मंदिर परिसर सुशोभिकरण. श्रीवर्धन : जाखमाता कुसूमादेवी मंदिराकडे जाणारा रस्ता तयार करणे, मंदिर परिसर सुशोभिकरण. मुरूड : नांदगाव येथील पर्यटनस्थळ सुशोभिकरण. अलिबाग : मालाडे येथील धावीर मंदिरसमोर निवारा शेड, परिसर सुशोभिकरण. ताजपूर येथील अंतर्गत रस्ता. रामराज अंतर्गत नांगरवाडी येथे रस्ता. नागाव बंदर सोमेश्वर मंदिर ते पीएनपी शाळेकडे जाणारा रस्ता. नागाव येथील चिंतामणी गल्ली ते कवळे परोडा रस्ता. सांबरी येथील पोहोच रस्ता. सांबरी येथील शिवमंदिर परिसर सुशोभिकरण. वाघजई येथील देवीचे मंदिर परिसर सुशोभिकरण. कनकेश्वर मंदिराकडील रस्ता. ताजपूर येथील पिंपळेश्वर मंदिर परिसर सुशोभिकरण. वरसोली मार्तंड देवस्थान वरसोली कोळीवाडा सुशोभिकरण व भक्त निवास. नवेदर नवगाव येथील शिवज्योती देवीच्या मंदिर जीर्णोद्धार. वरसोली येथील श्रीगणेश मंदिर येथे बुरुमखाण येथे संरक्षण भिंत बांधून सुशोभिकरण. मानी गावातील म्हसोबा मंदिर बांधणे. कार्ले गावातील शंकर मंदिराचे सुशोभिकरण. वरसोली येथील पर्यटनस्थळ सुशोभिकरण. सुडकोली येथील हनुमान मंदिर परिसर सुशोभिकरण. आवास येथील तलाव सुशोभिकरण. वरसोली येथील तलाव सुशोभिकरण.