नांदेड पाठोपाठ घाटी रुग्णालयात मृत्यूचे तांडव

| छ.संभाजीनगर | प्रतिनिधी |
नांदेड येथील सरकारी रुग्णालयातील 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयात मागील 24 तासांत 10 रुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत. घाटी रुग्णालयातील हा आकडा मंगळवारी 18 वर पोचला आहे.

या घटनेचे तीव्र्र पडसाद उमटले आहेत. राज्य सरकारमधील विविध मंत्री, आमदारांसह विरोधकांनी नांदेड आणि छत्रपती संभाजीनगरकडे धाव घेतली आहे. नांदेड येथील शासकीय रुग्णालयात 24 तासात 12 नवजात बालकांसह 24 रुग्णांचा मृत्यू होण्याच्या दुर्दैवी घटनेला एक दिवस होत नाही, तोच औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दोन नवजात बालकांसह 8 रुग्णांचा मृत्यू होतो. या घटना शासकीय आरोग्य व्यवस्थेला काळीमा फासणाऱ्या आहेत. कालची घटना ताजी असताना देखील प्रशासनाला जाग आली नाही ही, अतिशय दुर्दैवी बाब आहे. अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक्सवर दिली आहे.

एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी मंगळवारी रुग्णालयात येऊन पाहणी केली. यावेळी नांदेड-रुग्णालयात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते. हे पाहिल्यानंतर खासदार हेमंत पाटील चांगलेच संतापले त्यांनी थेट रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना (डीन) स्वच्छतागृह साफ करायला लावले. छत्रपती संभाजीनगरच्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालय म्हणजेच घाटी रुग्णालयात तब्बल 18 जणांच्या मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. औषधाच्या तुटवड्याने किंवा डॉक्टरच्या कमतरतेने, हलगर्जीपणामुळे हे मृत्यू झाले नसल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. यामध्ये बहुतेक मृत्यू झालेले रुग्ण अन्य ठिकाणी उपचार घेऊन या रुग्णालयात दाखल झाले होते, असे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version