देशातील 16 राज्यांमध्ये 100 टक्के लसीकरण

आरोग्य मंत्रालयाने दिली माहिती
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
देशात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचं थैमान सध्या सुरु आहे. मात्र, ही लाट दुसर्‍या लाटेइतकी गंभीर दिसून येत नाही. कोरोनाच्या संकटाला दोन हात करण्यासाठी लसीकरणाची मोहीम सुरु असून, सद्यःस्थितीत देशातील 16 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 100 टक्के लसीकरण झाले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील 16 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 100 टक्के लसीकरण करण्यात आलं आहे. तर 4 राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 96-99 टक्के लसीकरण झालं आहे. देशातील 34 राज्यांमधील रुग्णांमध्ये तसेच पॉझिटीव्हीटी रेटमध्ये घसरण होताना दिसत आहे. केरळ आणि मिझोराम या दोन राज्यांमध्ये रुग्णसंख्या तसेच पॉझिटीव्हीटी रेट वाढताना दिसून येत आहे.


सध्या देशातील 11 राज्यांमधील शाळा पूर्णपणे सुरु असून, 9 राज्यांमधील शाळा अद्यापही बंद आहेत, अशी माहिती शिक्षण मंत्रालयाने दिली. सध्याचा डेटा असं दाखवून देतो की, आधीच्या कोरोना रुग्णवाढीच्या तुलनेत सध्याच्या व्हेरियंटमधील परिस्थिती सुरक्षित आहे. तसेच कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांमधील मृत्यूची शक्यता कमी आहे. त्यामुळे ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज आहे त्यांनी ते नाकारण्याची गरज नाही. ते करु शकतात, असं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.

Exit mobile version