शेतकर्‍यांचा सातबारा १०० टक्के कोरा होणार: आ.जयंत पाटील

शेकाप आ.जयंत पाटील यांनी रणशिंग फुंकले
सेझ प्रकल्पाविरोधात पेणचे शेतकरी आक्रमक आंदोलन पेटणार

। पेण । प्रतिनिधी ।
पंधरा वर्षापूर्वी पेण, उरण, पनवेल तालुक्यातील 47 गावांच्या जमिनी सेझ प्रकल्पासाठी संपादित केली होत्या. त्यातील 24 गावे ही पेण तालुक्यातील होती. मात्र, आजमितीस हा प्रकल्प पुर्णत्वास गेला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना नेता म्हणून लढा उभारुन बाधित शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्यास सरकारला भाग पाडण्याची ताकद आपल्यात आहे. आपण सर्वांनी एकत्र काम केल्यास शेतकर्‍यांचा सातबारा 100 टक्के कोरा करु, असे आश्‍वासन शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी दिले.

आ. जयंत पाटील यांनी अधिवेशनामध्ये सेझबाधित शेतकर्‍यांचे सातबारे कोरे करण्यासाठी लक्षवेधी मांडून सरकारला उत्तर देण्यासा भाग पाडले. या संदर्भात आपली भूमिका शेतकर्‍यांना सांगण्यासाठी वाशी येथील जगदंबा मंदीराच्या सभागृहात रविवारी (दि.11) बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी यावेळी अर्बन बॅकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, माजी आमदार पंडीत पाटील, जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, आरडीसीसी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, शैला पाटील, खोपोलीचे माजी नगराध्यक्ष संतोष जंगम, पेणचे माजी नगराध्यक्ष गुरुनाथ मांजरेकर, व्ही. बी. सर, प्रकाश शीगृत, चंद्रकांत पाटील, नंदा म्हात्रे, स्मिता पाटील, अनंत पाटील, निलेश म्हात्रे, के.पी. पाटील, जयप्रकाश ठाकूर, सेझबांधित शेकडो शेतकरी उपस्थित होते.

यापुढे मार्गदर्शन करताना आ. जयंत पाटील यांनी सांगितले की, शेतकर्‍यांचे सातबारे 100 टक्के कोरे केले जातील. तसा कायदाच आहे. एखादा प्रकल्प सरकारने दिलेल्या वेळेत पुर्ण झाला नाही, तर शेतकर्‍यांची जमीन विनाशर्त परत करायची असते. मात्र सरकार या गोष्टीला टाळाटाळ करत आहे. सर्व प्रकारची व सर्व स्तरावर लढाई लढली जाईल. कायद्याने लढाई लढू.विधीमंडळामध्ये शेतकर्‍यांसाठी लढणार्‍या आमदारांना एकत्र करु आणि लढा उभारु. प्रामाणिक काम केल्यास सभागृहातील नेतेही सहकार्य करतात. संपूर्ण देशात कुठेही विरोध झाला तरी तो विरोध मोडून काढता येईल. महाराष्ट्रातील विशेषतः रायगड जिल्हयातील आगरी समाजाच्या नादी लागू नका, असेही त्यांनी ठणकावले.

शेतकरी लढ्याचे वाशी हे केंद्रबिंदू
शेतकर्‍यांसाठी आजोबांनी म्हणजेच नारायण नागू पाटील यांनी याच भूमीतून शेतकर्‍यांचा लढा उभारला होता. शेतकर्‍यांची चळवळ उभारुन आंदोलन करणारे ते श्रमजीवी नेते होते. त्या लढ्यात वाशी हे ठिकाण केंद्रबिंदू होतं. म्हणूनच आज सेझविरोधातील लढाईची सुरुवात करण्यासाठी हे ठिकाण् निवडले असल्याचे आ. जयंत पाटील यांनी सांगितले. याशिवाय इतिहास विसरु नका, असे आवाहनही केले.

शेतकर्‍यांमुळेच सन्मान
आमदार होत असताना कधीही पोटासाठी किंवा धंदा म्हणून राजकारण केले नाही. आज स्वार्थासाठी लोक राजकारण करीत आहेत. ही दुर्देव आहे. शेतकर्‍यांना पाठिंबा देणं ही परंपरा आहे. त्यामुळे आयुष्यभर गोरगरिब, शेतकर्‍यांसाठी लढलो. त्यांनी कायमच आशीर्वाद दिले. म्हणूनच आजही कोणत्याही संकटांना उभं राहण्याचं बळ मिळतं. 11 गावांची पुण्याई कायम पाठिशी आहे. त्यांच्यामुळे आज सन्मान असल्याचे आ. जयंत पाटील यांनी प्रामाणिक मत व्यक्त केले.

सेझविरोधातील लढ्याचे आ. जयंत पाटील करणार नेतृत्व
वाशी येथील सभेत आ. जयंत पाटील यांनी शेतकर्‍यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जमिनी हव्या कि, पैसे याबाबत शेतकर्‍यांनी निर्णय घेण्याचे आवाहन केले. आ. पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे जमिनींबाबत सत्तता जाणून घेतल्यानंतर शेतकर्‍यांनी एकमुखाने त्यांना पाठिंबा दर्शविला. तसेच सेझविरोधी लढ्याचे नेतृत्व आ. जयंत पाटील यांनीच करावे, अशी विनंती केली.

Exit mobile version