रायगडात लालपरी पुन्हा सुसाट; जवळपास 100 टक्के एसटी कर्मचारी कामावर रुजू

I अलिबाग I प्रतिनिधी I
एसटी कर्मचार्‍यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले होते. यामुळे एसटी कर्मचारी आता कामावर परतू लागले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर 576 कर्मचारी कामावर परतले आहेत. आतापर्यंत रायगड जिल्ह्यातील एकूण आठ विभागांतील 1650 कर्मचार्‍यांपैकी 1641 एसटी कर्मचारी कामावर हजर झाले आहेत, अशी माहिती रायगडच्या विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली.

रायगड विभागाच्या हजेरी पटलावर प्रशासकीय कार्यशाळा चालक, चालक तथा वाहक आणि वाहक अशी 1,650 इतकी कर्मचार्‍यांची संख्या आहे. एसटी महामंडळ प्रशासनाकडून सर्व कर्मचार्‍यांना कामावर हजर राहण्यासंदर्भात 22 एप्रिलची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर आठ आगारातील जवळपास 1641 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत, असेही बारटक्के यांनी सांगितले. त्यामुळे ग्रामीण भागासह इतर सर्व ठिकाणी बससेवा पूर्ववत सुरू झाली आहे. यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. अलिबाग आगारातील एसटी सेवाही पूर्ववत सुरु झाली आहे. शंभर टक्के कर्मचारी कामावर रुजू झाल्याने एसटी धावू लागली आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचार्यांनी नोव्हेंबरपासून संप पुकारला होता. संपामुळे ग्रामीण भागातील एसटीची वाहतूक थांबली होती. त्यामुळे प्रवाशांसह शालेय विद्यार्थी, नोकरदार वर्गांचे हाल झाले होते. उन्हाळी सुट्टीत पर्यटन स्थळ व गावाकडे कसे जायचा, असा प्रश्‍न नागरिकांना पडला होता. 22 एप्रिलपर्यंत एसटी कर्मचार्‍यांना कामावर हजर होण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार कर्मचारी कामावर हजर राहण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यानुसार गावागावात एसटी वाहतूक पूर्ववत सुरु झाली आहे. लांब पल्ल्यासह शटल व ग्रामीण फेर्‍या विविध आगारामार्फत पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील गावागावामध्ये लालपरी सुसाट धावू लागल्याचे चित्र ठिकठिकाणी पाहावयास मिळत आहे.

रायगडातील आठ विभागातील एसटी फेर्‍या
पेण – 281
अलिबाग – 131
मुरुड – 60
महाड – 114
माणगाव – 171
श्रीवर्धन – 141
रोहा – 138
कर्जत – 198
एकूण बसेस फेर्‍या – 1234
इंजिन, बॅटरी खराब बस – 20
न्यायालयाच्या निर्णयानंतर परतलेले कर्मचारी – 576

उत्पन्न 25 लाखांच्या घरात
राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या रायगड विभागात एकूण आठ आगार (डेपो) आहेत. त्यात माणगाव, महाड, कर्जत, श्रीवर्धन, मुरूड, अलिबाग, रोहा आणि पेण यांचा समावेश आहे. संपाचा एसटीच्या उत्पन्नाला मोठा फटका बसलाय, हे खरेय. परंतु, परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. आठ आगाराध्ये संपापूर्वी 340 गाड्या चालविण्यात येत होत्या, त्यानंतर आता 300 च्या जवळपास एसटी बसेस दररोज धावतात. दिवसभरात 60 हजार किलोमीटरचा प्रवास या बसेस करत असून, त्यातून एसटी महामंडळाला दररोज 25 लाख रुपये इतके उत्पन्न मिळते, अशी माहिती अनघा बारटक्के यांनी दिली.

नोकरीत येण्याचा हक्क संपला
आतापर्यंत 567 संपकरी कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. परंतु, न्यायालयाच्या आदेशानंतर बहुतांश कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. परंतु, आज जे कामगार हजर झाले नाहीत, त्यांचा नोकरीत येण्याचा हक्क संपला असून, त्यांच्यावर वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अनघा बारटक्के यांनी दिली.

ज्येष्ठ नागरिक, अपंग, विद्यार्थ्यांकडून समाधान
या संपामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. विशेषतः ग्रामीण भागातून येणारे वृद्ध नागरिक, अपंग व्यक्ती, रुग्ण, विद्यार्थी यांना या संपाचा मोठा फटका बसला आहे. त्यांना एसटीकडून मिळणार्‍या सवलतीचा लाभ तर होत नाहीच, उलट अधिकचे पैसे देऊन खासगी प्रवासी वाहनांनी प्रवास करावा लागला आहे. परंतु, रायगडातील एसटी सेवा पूर्ववत सुरू होणार असल्याने प्रवाशांकडून समाधान व्यक्त होत आहे.

कामावर पुन्हा रुजू झालेल्या सर्व संपकरी कर्मचार्‍यांना धन्यवाद देते. तसेच संपाच्या काळात खास करुन ग्रामीण भागातील जनतेचे खूपच हाल झाले आहेत. त्यामुळे याच्यापुढे तरी आपण सर्वांनी मिळून जनतेला चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करुया, इतकेच माझ्या कर्मचार्‍यांना सांगणे असेल.

अनघा बारटक्के, विभागीय नियंत्रक, रायगड
Exit mobile version