समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांच्या नेतृत्वाखालील पाऊल
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील झिराड ग्रामपंचायती हद्दीतील नागरिकांचे 100 टक्के कोव्हिड लसीकरण पूर्ण झाले आहे. रायगड जिल्ह्यातील 810 ग्रामपंचायतींपैकी झिराड ग्रामपंचायतीला गावात 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्याचा मान मिळाला आहे. त्यामुळे झिराड ग्रामपंचायत हद्दीत कोरोना प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. रायगड जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांच्या नियोजनबद्ध आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्यातून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. पालकमंत्री अदिती तटकरे यांच्यासह शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या उपस्थितीत या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी झिराड ग्रामपंचायतील नागरिकांचे 100 टक्के लसीकरण पूर्ण केल्याबद्दल दिलीप भोईर आणि प्रशासनाचे कौतुक केले. कोरोना विषाणू प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर आणि प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नसल्याने अनेकांना या आजाराची लागण झाली. अनेकांना कोरोनामुळे मृत्यू आला. कोरोना प्रतिबंधात्मक लस निर्मिती झाल्यानंतर शासनाकडून लस पुरवठा होऊ लागला. मात्र शासनाकडून येणारा लसींचा पुरवठा आणि नागरिकांच्या संख्या पाहता सर्वांनाच लस मिळणे शक्य नव्हते. आपल्या झिराड गावातील आणि तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी दिलीप भोईर यांनी पुढाकार घेतला. झिराड ग्रामपंचायत हद्दीतील उद्योगपती बंगलेधारक यांच्या सहकार्यातून खाजगी पद्धतीने लसीकरण मोहीम हाती घेतली. खाजगी माध्यमातून 15 हजार 850 तर शासनाकडून 1700 लसींचा साठा उपलब्ध करून तीन-चार महिन्यांत झिराड ग्रामस्थांचे दोन्ही डोस देऊन 100 टक्के लसीकरण पूर्ण केले. ग्रामीण प्रगती फौंडेशनच्या माध्यमातून आज 1 हजार डोस उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांचेही लसीकरण होणार आहे. पालकमंत्री अदिती तटकरे यांनी आज झिराड शाळेत सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेचे उदघाटन केले. यावेळी झिराड ग्रामपंचायत आणि दिलीप भोईर यांनी सामाजिक संस्थांच्या आणि व्यक्तींच्या माध्यमातून केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. झिराडकरांना 100 टक्के लसवंत केल्याने दिलीप भोईर यांचे विशेष कौतुकही केले. शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, सरपंच दर्शना भोईर, ग्रामीण प्रगती फौंडेशनचे संस्थापक देवांग नैराला, मंगेश डफळे आदी यावेळी उपस्थित होते.