पनवेलकरांना 100 दराने टँकरने पाण्याचा पुरवठा


| पनवेल | वार्ताहर |

महापालिका क्षेत्रात आणखी आठ दिवस 20 टक्के पाणीकपात सुरू राहणार आहे. सिडकोने या दरम्यान, रहिवाशांना पाण्याची टंचाई भासू नये यासाठी 100 रुपये दराने एक टॅँकर पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना आता अधिकचे पैसे खर्च करुन टँकरच्या पाण्याचा वापर करावा लागणार आहे. करंजाडे वसाहतीमध्ये पाणीकपात सुरू करण्याच्या आधीपासून अनेक दिवस टंचाईचा सामना रहिवाशी करत आहेत.

नागरिकांमध्ये सिडका आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठ्याच्या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे सिडकोने पाणीपुरवठा टँकरने करण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची 27 तारखेपर्यंत टप्प्याटप्प्याने पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सर्वाधिक झळ सिडको वसाहतीमधील नागरिकांना बसणार आहे.करंजाडे येथील नागरिकांनी एका सोसायटीत दिवसाला चार टँकर पाणी लागत असून एका टँकरसाठी दोन हजार रुपये मोजावे लागत असल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे सिडकाने एक टँकर पाणी (10 हजार लिटर) शंभर रुपयांमध्ये संबंधित गृहनिर्माण संस्थेला पोहोच करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सिडकोच्या जनसंपर्क विभागाच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी दिली. तसेच टँकरसाठी लागणारी शंभर रुपये रक्कम कोणत्याही कर्मचायाच्या हाती न देता संबंधित गृहनिर्माण संस्थेच्या पाणीपुरवठ्याच्या देयकामध्ये त्याचा समावेश केला जाईल, असे सिडकोने स्पष्ट केले आहे; परंतु पाणीकपात सुरू असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
शनिवारी आसूडगाव, खांदा कॉलनी, त्यानंतर रविवारी नवीन पनवेल पूर्व बाजूकडील, सोमवारी पनवेल पालिका आणि पोदी अशी टप्प्यात पाणीकपात केली जाणार आहे.

या कालावधीत या परिसरातील नागरिकांना पाणीटंचाई भासू नये यासाठी सिडको मंडळाने संबंधित वसाहतींच्या पाणीपुरवठा कार्यालयाकडे रहिवाशांनी तक्रार केल्यावर तेथील पाणीपुरवठा विभागातील अभियंते खरोखरच टंचाई आहे का याची चाचपणी करणार आहेत, त्यानंतरच टँकरने पाणीपुरवठा संबंधित गृहनिर्माण संस्थेला केला जाणार आहे.

Exit mobile version