। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थगित नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या निवडणुकांच्या जागा अनारक्षित करून त्या सर्वसाधारण प्रवर्गातून घेण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील 6 नगरपंचायतीतून 21 जागांसाठी आज 77 नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. आतापर्यंत नामनिर्देशन पत्रांची एकुण संख्या 102 इतकी झाली आहे. या जागांसाठी 18 जानेवारी 2022 रोजी मतदान घेण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार रायगड जिल्ह्यातील खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, पाली (नवनिर्मित) या सहा नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्व जागांकरिता 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या 6 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार मात्र या सर्व निवडणुकांतील नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवरील निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. अन्य सर्व जागांची निवडणूक प्रक्रिया पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार नुकतीच पार पडली. सर्वोच्च न्यायालयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आरक्षणाला दिलेल्या स्थगितीच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या प्रत्येकी एकुण 21 ओबीसी प्रभागातील निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
उर्वरित जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार खालापूर नगरपंचायतीच्या एका जागेसाठी आज 6 एकूण 6, तळा नगरपंचायतीच्या 4 जागांसाठी आज 18 तर एकूण 26 नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहेत. माणगावसाठी आज 15 तर एकुण 16, पालीत आज 15 तर एकूण 28 अर्ज, पोलादपूरमध्ये आज 17 एकूण 17 तसेच म्हसळा नगरपंचायतीसाठी आज 6 तर आतापर्यंत एकूण 9 असे सहा नगरपंचायतींसाठी आज 77 तर आतापर्यंत एकूण 102 नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहेत.
ओबीसीतून खुल्या प्रवर्गात गेलेल्या या जागांसाठी 18 जानेवारीला मतदान होईल. त्यानंतर 19 जानेवारी रोजी त्याचा निकाल जाहीर केला जाईल.