12 वर्षांत 2 लाख 3 हजार 864 रुग्णांना मदत; अपघात, प्रसूती ते गंभीर जखमींना वेळेत उपचार
| रायगड | प्रमोद जाधव |
रस्ते अपघात, हृदयविकाराचा झटका, प्रसूती, नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य वैद्यकीय आणीबाणी… अशा संकटाच्या क्षणी रायगडकरांसाठी ‘108′ रुग्णवाहिका सेवा अक्षरशः जीवनदायिनी ठरली आहे. गेल्या 12 वर्षांत या सेवेद्वारे तब्बल 2 लाख 3 हजार 864 रुग्णांना तातडीची वैद्यकीय मदत मिळाली असून, हजारो जीव वाचविण्यात या सेवेची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यात 2014 पासून 108 रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांशी समन्वय साधत ही सेवा कार्यरत आहे. बीव्हीजी कंपनीमार्फत या सेवेचे संचालन केले जाते.
जिल्ह्यात सध्या 23 रुग्णवाहिका कार्यरत असून, 108 क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर काही मिनिटांत रुग्णांपर्यंत पोहोचून प्राथमिक उपचारांसह त्यांना जवळच्या अथवा आवश्यकतेनुसार मोठ्या रुग्णालयात दाखल केले जाते. दररोज सुमारे 200 किलोमीटरचा प्रवास करत या रुग्णवाहिका ग्रामीण व दुर्गम भागातील रुग्णांनाही दिलासा देत आहेत.
या सेवेद्वारे वाहन अपघातातील जखमी, भाजलेले, हृदयविकाराचे रुग्ण, प्रसूती माता, गंभीर जखमी, आत्महत्येचा प्रयत्न केलेले तसेच अन्य वैद्यकीय कारणांमुळे उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना वेळेत मदत मिळत आहे. त्यामुळे 108 रुग्णवाहिका सेवा जिल्ह्यातील आपत्कालीन आरोग्य व्यवस्थेचा महत्त्वाचा आधार बनली आहे.
17 नव्या रुग्णवाहिकांची प्रतीक्षा
सध्या कार्यरत असलेल्या अनेक 108 रुग्णवाहिका दीर्घकाळ वापरामुळे जुन्या झाल्या असून, त्यांना वारंवार तांत्रिक बिघाडांचा सामना करावा लागत आहे. इंजिन, स्टेअरिंग आदी समस्या वाढू लागल्याने जिल्ह्यासाठी 17 नव्या रुग्णवाहिकांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. या रुग्णवाहिका उपलब्ध झाल्यास आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि गतिमान होणार आहे.
दृष्टिक्षेपात रुग्णवाहिका सेवा
वाहन अपघात - 8452
हल्ल्यात जखमी झालेले - 1130
हृदयविषयक - 2449
भाजलेले - 925
वैद्यकीय मदतीसाठी असणारे - 1,34,623
आत्महत्या करणारे रुग्ण- 151
पडलेले - 3508
गंभीर दुखापत - 6959
जखमी कामगार आणि प्रसूती माता- 25,165
एकूण - 203864
