| नेरळ | प्रतिनिधी |
समान काम, समान वेतनाच्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप आंदोलन कर्जत येथे सुरू झाले. राज्य पातळीवरील चार संघटना यांनी एकत्र येत हे आंदोलन सुरू केले असून मार्ग न्यायालयात कर्मचारी वर्गाच्या काम बंद आंदोलनामुळे येथील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. महाराष्ट्र राज्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी दि.17 नोव्हेंबरपासून बेमुदत संप सुरू केला आहे. “समान काम, समान वेतन” या प्रमुख मागणीसह न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. या आंदोलनात कर्जत दिवाणी न्यायालयातील कर्मचारी देखील सहभागी झाले असून, या बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. “चार संघटना एकच निर्धार” असा संदेश देत रायगड जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले असून, मागण्या मान्य होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.






