108 रुग्णवाहिका सेवेला बळकटी

रस्ता, नदी आणि समुद्रावरही सेवा मिळणार

| रायगड | प्रतिनिधी |

मोफत रुग्णवाहिका सेवा ‌‘108′ आणखी मजबूत होणार आहे. ही सेवा देण्यासाठी राज्य सरकारने नवीन कंपनीची निवड केली आहे. जनतेसाठी रुग्णवाहिकांची संख्या पूर्वीपेक्षा जवळपास दुप्पट होणार आहे.

आपत्कालीन परिस्थितीत आणि रस्ते, रेल्वे अपघात आणि इतर अनुचित घटनांमध्ये रुग्णांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी ‌‘108′ रुग्णवाहिका शासनाकडून चालवली जाते. 108 क्रमांकावर कॉल करताच रुग्णवाहिका तातडीने रुग्णाला रुग्णालयात पोहोचवते. सरकारने यासाठी कंपनी नेमली होती. कंपनीसोबतचा करार काही महिन्यांपूर्वी संपला होता, त्यानंतर सरकार नवीन पुरवठादाराच्या शोधात होते.

सरकारने ही सेवा देण्यासाठी सुमीत फॅसिलिटीज लिमिटेड आणि ग्रुप्स एसएसजी मॅट्रिक्स, स्पेन यांची निवड केली आहे. आता महाराष्ट्रात आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविण्याची जबाबदारी कंपनीवर सोपवण्यात आली आहे. आतापर्यंत 937 रुग्णवाहिका सेवा देत होत्या, मात्र आता रुग्णवाहिकांची संख्या 1756 होणार आहे. सुमीत ग्रुप एंटरप्रायझेसचे सुमीत साळुंखे म्हणाले की, सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या उपक्रमाचा रुग्ण सेवेवर दूरगामी प्रभाव पडेल.

1756 विशेष रुग्णवाहिकांपैकी यामध्ये 1273 मूलभूत जीवन सपोर्ट, 255 प्रगत जीवन सपोर्ट, 36 नवजात रुग्णवाहिका, 166 बाईक रुग्णवाहिका, 10 समुद्री बोट आणि 15 नदी बोट रुग्णवाहिका यांचा समावेश आहे. या सर्व रुग्णवाहिका आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असतील. सरकार त्याच्या ऑपरेशन खर्चावर अंदाजे 425 कोटी ते 800 कोटी रुपये खर्च करणार आहे.

हेलिकॉप्टर आणि ड्रोन सेवेवर लक्ष
आरोग्य विभागाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, सरकार लवकरच एअर ॲम्बुलन्स (हेलिकॉप्टर) आणि ड्रोनचा वापर करण्याचा विचार करत आहे. यासोबतच, रुग्णाला रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी रुग्णालयांना माहिती दिली जाईल, जेणेकरून ते रुग्णाला तत्काळ उपचार देण्यासाठी तयार होतील, अशी यंत्रणा तयार करण्याचीही योजना आहे.
Exit mobile version