शिवसेना ठाकरे पक्षाचे आवाहन
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात पाली सायडोंगर येथे प्रस्तावित असलेल्या टोरंट हायड्रॉलिक पॉवर प्रकल्प रद्द करण्यात यावा, तसेच झाडे तोडणाऱ्यांविरुद्ध 15 दिवसांत गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी (दि.2) कर्जत तालुका बंद ठेवण्याचे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केले आहे.
कर्जत तालुक्यातील पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील परिसरात आणि सह्यादी पर्वतरांगेत प्रस्तावित टोरेन्ट पॉवरच्या 3 हजार मेगावॅट पंप्ड स्टोरेज प्रकल्पावरून संघर्ष पेटला आहे. या प्रकल्पामुळे येथील जंगलावर अवलंबून असलेल्या कुटुंबांना रानमेवा, मध, औषधी वनस्पती आणि विविध रानभाज्यांमधून मिळणारे उत्पन्न बाधित होईल, असा दावा पर्यावरणप्रेमींकडून करण्यात आला आहे. तसेच ग्रामसभा, वनहक्क आणि आदिवासींच्या सहभागासंदर्भातील कायदेशीर प्रक्रियेचे काटेकोर पालन झाले आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. साय डोंगर परिसरातील जंगलात बिबट्या, शेकरू, मोर, यांसह विविध वन्यजीवांचा अधिवास असल्याचे सांगत, वृक्षतोडीमुळे जैवविविधतेवर गंभीर परिणाम होण्याचा इशारा पर्यावरणप्रेमींनी दिला आहे.
तसेच, या प्रकल्पामुळे उल्हास-पेज नदी जलस्रोतांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कर्जत तालुक्यातील अनेक गावांना आधीच पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना मोठ्या प्रकल्पासाठी पाण्याचा वापर वाढल्यास भविष्यातील पाणीप्रश्न गंभीर होऊ शकतो, असा दावा करण्यात येत आहे. सह्याद्रीच्या संवेदनशील भूभागात अशा प्रकल्पासाठी भूगर्भशास्त्रीय, जलवैज्ञानिक आणि आपत्ती जोखीम यांचे अहवाल सार्वजनिक करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.त्याविरुद्ध शिवसेना ठाकरे पक्षाने सोमवारी कर्जत तालुका बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. या बंदमध्ये सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि व्यापारी संघटना यांनी सहभागी व्हावे, अशी विनंती शिवसेना पक्षाने पत्रव्यवहार करून केली आहे.




