शिक्षकांचा पेपर तपासणीवर बहिष्कार
| मुंबई | प्रतिनिधी |
दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू असतानाच आपल्या विविध मागण्यांसाठी विनाअनुदानित शाळा कृती समितीने पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. यामुळे त्याचा परिणाम निकालावर होणार आहे. शिक्षकांच्या बहिष्कारामुळे पालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. दरम्यान, शासन शाळांना देत असलेल्या अनुदानाचा टप्पा वाढवत नाही. त्यामुळे विनाअनुदानित शाळा कृती समितीने पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या समिती 63 हजार शिक्षक आहेत. यासंदर्भातील निवेदन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळच्या सचिवांना देण्यात आले आहे. जोपर्यंत अनुदानाबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत बहिष्कार कायम ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाकडून बहिष्काराचा निर्णय घेतला होता. परंतु, त्यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर त्यांनी निर्णय मागे घेतला.