37 हजार 579 विद्यार्थी बसणार परीक्षेला; 24 पथकामार्फत राहणार जिल्ह्यात नजर
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
बारावीच्या परीक्षेनंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावीची लेखी परीक्षा शुक्रवारी (दि.20)पासून घेण्यात येणार आहेत. परीक्षेच्यावेळी गैर प्रकार घडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. जिल्ह्यामध्ये कॉपीमुक्त अभियान प्रशासनामार्फत राबविण्यात आले आहे. या अभियानातून जिल्ह्यामध्ये 24 पथकामार्फत विद्यार्थ्यांच्या प्रत्येक संशयीत हालचालीवर लक्ष ठेवले जाणार आहे.
जिल्ह्यामध्ये दहावीची लेखी परीक्षा 20 फेब्रुवारीपासून सुरु होणार असून 18 मार्चपर्यंत परीक्षा असणार आहे. या परीक्षेसाठी 37 हजार 579 विद्यार्थी बसणार आहे. 75 केंद्रामध्ये परीक्षा घेतल्या जाणार आहेत. जिल्ह्यामध्ये कॉपीमुक्त अभियान राबविले जाणार आहे. परीक्षेला येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची झडती घेतली जाणार आहे.त्यासाठी जिल्हा स्तरासह तालुका स्तरावर 24 भरारी पथके नेमण्यात आले आहेत. प्रत्येक तालुक्यामध्ये एक असे एकूण 15 तसेच जिल्हा स्तरावर भरारी पथक असणार आहेत. प्रत्येक केंद्रामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे. याचे नियंत्रण जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे असणार आहे. जिल्ह्यात बैठक पथकदेखील तयार केले आहे. या पथकामार्फत सीसीटीव्हीची पाहणी केली जाणार आहे. काही गैरप्रकार दिसून आल्यास तात्काळ हे बैठक पथक घटनास्थळी दाखल होऊन कारवाई करणार आहे. कॉपी करणाऱ्यांसह कॉपी करण्यास प्रोत्साहन देणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे. त्या केंद्रावरील मान्यता रद्द केली जाणार आहे.
जिल्ह्यामध्ये शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांपैकी पनवेल तालुक्यामध्ये 13 हजार 427, तर तळा तालुक्यात 227 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहे. अन्य तालुक्यांमध्ये पावणे पाचशेपासून साडेतीन हजारपर्यंत विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
दहावीच्या परीक्षा 20 फेब्रुवारीपासून घेतल्या जाणार आहे. परीक्षा केंद्राच्या परिसरात पोलिसांचा कडेकोट पहारा असणार आहे. परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश काढले जाणार आहे. या परिसरातील झेरॉक्स दुकानासह अन्य दुकाने बंद केली जाणार आहेत. तसेच ड्रोन कॅमेरादेखील या परिसरात असणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्राच्या परिसरातील व केंद्रातील संशयीत हालचालीवर लक्ष ठेवले जाणार आहे.





