वांग्याच्या झाडाला 11 प्रकारची वांगी

माले येथील प्रगतशील शेतकरी अरुण वेहले यांची किमया

| नेरळ | वार्ताहर |

शेतीमध्ये आधुनिकता येत आहे. त्यामुळे प्रयोग करणे आणि त्यातून उत्पन्न वाढीसाठी शेतकरी प्रयत्न करत असतात. असाच काहीसा प्रयोग कर्जत तालुक्यातील माले या गावात प्रगतशील शेतकरी अरुण वेहले यांनी केला आहे. त्यामुळे एका झाडाला तब्बल 11 प्रकारची वांगी लगडली आहेत. सध्या परिसरात या अजब वांग्याच्या झाडाची चर्चा पसरली आहे.

शेती हीच आपली माय समजत तिच्यात काळानुरूप बदल करत प्रयोगशील शेतकरी म्हणून अरुण वेहले या शेतकऱ्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. कर्जत तालुक्यातील माले या भागात अरुण वेहले हे राहतात. वेहले यांचे वडील देखील शेतीच करायचे. त्यावेळी भातशेती यातून उत्पन्न जास्त मिळत नसल्याने ते जोडशेती म्हणून टोमॅटोची शेती करायचे पण त्यातून उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशी परिस्थिती होती. त्यामुळे वयाने लहान असलेल्या अरुण वेहले यांना हि गोष्ट खटकली. अरुण वेहले हे मोठे होत असताना त्यांनी वडिलांसोबत आपली पारंपरिक शेती सांभाळली.

मात्र यासोबत भाजीपाला शेती त्यांनी सुरूच ठेवली. तर विज्ञान शाखेची शेतीची पदविका घेतलेल्या अरुण वेहले यांनी आजही आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग सुरूच ठेवले आहेत. सध्या त्यांनी एका वांग्याच्या झाडाला तब्बल 11 कलम केले आहेत. त्यामध्ये काळा गोटा, पांढरी वांगी, कृष्णा, मंजिरी, सिडलेस, व इतर गावरान प्रकार असे एकूण 11 कलाम त्यांनी या झाडाला केले आहेत. यासोबत त्यावर सेंद्रिय खतांचा वापर केला आहे. वांगी म्हटली कि त्यावर कीड पडणे हे प्रामुख्याने होतेच मात्र सेंद्रिय खत व कलाम यामुळे या झाडावर असंख्य वांगी फळे लगडली असून एकही फळाला किडीचा प्रादुर्भाव झालेला नाही.

आम्ही केलेला वांगी लागवडीचा हा प्रयोग यशस्वी झाला असून यापुढे जादा लागवडीचा विचार करणार आहे. तसेच शेतीतले माझे प्रयोग यापुढे देखील सुरूच राहतील त्याला शासनाची साथ लाभल्यास शेतकरी जगण्यास मदत होईल हे सुद्धा तितकेच खरे आहे. शासनाने याकडे लक्ष दिले पाहिजे.

अरुण वेहेले
प्रगतशील, शेतकरी, माले-कर्जत
Exit mobile version