आमदार चषक कबड्डी स्पर्धेत 11 संघ बाद फेरीत दाखल

| मुंबई | प्रतिनिधी |

ना.म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना येथे सुरू असलेल्या बंड्या मारुती सेवा मंडळ आयोजित आमदार चषक कबड्डी स्पर्धेत 11 संघ बाद फेरीत दाखल झालेले आहेत. यामध्ये विजय क्लब, विजय नवनाथ, गुड मॉर्निंग, गोलफादेवी, अमर क्रीडा व जय भारत क्रीडा या मुंबईच्या पुरुष संघाबरोबर पुण्याच्या बाबुराव चांदेरे सोशल फौंडेशन, नांदेडच्या बाबुराव चांदेरे सोशल फौंडेशन, उपनगरच्या स्वस्तिक, ठाण्याच्या शिवशंकर व रत्नागिरीच्या वाघजाई मंडळ यांचा समावेश आहे. अजूनही पुरुषांचे चार साखळी सामने बाकी असून या सामन्याच्या निकालावर कोणते चार संघ बाद फेरी गाठतील हे नक्की होईल.

नवनाथने मावळी मंडळाला 46-23 असे सहज नमवित बाद फेरी गाठली. वजय क्लबने देखील मावळी मंडळाला 49-29 असे नमवित साखळीतील दुसर्‍या विजया बरोबर बाद फेरी गाठली. रत्नागिरीच्या वाघजाईने उपनगरच्या अंबिकाला 36-33 असे चकवीत बाद फेरीतील आपला मार्ग मोकळा केला.

या गटात जय भारत हा बाद फेरी गाठणारा दुसरा संघ ठरला. नांदेडच्या बाबुराव चांदेरे सोशल फौंडेशनने मुंबईच्या गोलफादेवीला 41-21 असे लीलया नमवित आपली आगेकूच केली. पुण्याच्या बाबुराव चांदेरे सोशल फौंडेशनने देखील ‘ग’ गटात मुंबईच्या नवोदित संघाचा 51-29 असा लीलया पराभव करीत बाद फेरी गाठली. या गटातून बाद फेरी गाठणारा ठाण्याचा शिवशंकर हा दुसरा संघ ठरला.

पुण्याच्या राकेशभाऊ घुले मंडळाने उपनगरच्या सत्यमला 32-30 असे पराभूत करीत बाद फेरी गाठण्याच्या आपल्या आशा कायम ठेवला. राकेशभाऊ संघाला बाद फेरी गाठायची असेल तर शेवटच्या साखळी सामन्यात विजय मिळवावा लागेल किंवा कमी गुणांच्या फरकाने पराभूत व्हावे लागेल. मोरया संघाला बाद फेरी गाठावयाची असेल तर त्यांना मोठ्या फरकाने विजय आवश्यक आहे. लायन्स स्पोर्ट्सने ह गटात उपनगरच्या उत्कर्षाला 43-18 असे नमवित बाद फेरी गाठण्याच्या आशा पल्लवित ठेवल्या. आता त्यांना मिडलाईटने विजय मिळवावा म्हणून देव पाण्यात ठेवावा लागेल.


महिलांच्या ‘अ’ गटात मुंबईच्या शिवशक्तीने ठाण्याच्या ज्ञानशक्ती महिला संघाला 54-19 असे सहज नमविले. राजर्षी छत्रपती शाहूने होतकरूला 40-33 असे पराभूत करीत बाद फेरीचा आपला मार्ग मोकळा केला. धुळ्याच्या शिवशक्तीने महात्मा गांधी स्पोर्ट्सचा 30-20 असा पाडाव करीत साखळीत दुसर्‍या विजयाची नोंद केली. नवशक्ती स्पोर्ट्सने श्री स्वामी समर्थला 32-26 असे पराभूत करीत बाद फेरी गाठण्याच्या दृष्टीने आगेकूच केली. महिलांत अजून बाद फेरी कोण गाठणार हे होणार्‍या चार सामन्यातून निश्रि्चत होईल.

Exit mobile version