महाष्ट्रातील एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत
। यवतमाळ। प्रतिनिधी ।
उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये महाराष्ट्रातील एकाच कुटुंबातील 3 जणांचा समावेश आहे.
रूद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंड येथे रविवारी (दि. 15) पहाटे खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात पायलटसह एकूण 7 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये वणीतील जयस्वाल कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. राजकुमार जयस्वाल, पत्नी श्रद्धा जयस्वाल आणि त्यांची दोन वर्षांची मुलगी काशी राजकुमार जयस्वाल अशी या मृतांची नावे आहेत. तर कॅप्टन राजबीरसिंग चौहान असे हेलिकॉप्टरचे पायलटचे नाव आहे. या अपघातातील बहुतांश मृतक हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. हे सर्व भक्त पहाटे केदारनाथ दर्शनासाठी हेलिकॉप्टरने निघाले होते. दोन हेलिकॉप्टरमधून या सर्वांचा प्रवास सुरू होता, अशी माहिती आहे. दरम्यान जयस्वाल कुटुंबीय आणि गुजरात, उत्तरप्रदेशातील काही भक्त आर्यन एविएशनच्या हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करत होते. गौरीकुंड सोनप्रयागच्या जंगलात खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे हेलिकॉप्टर भरकटले आणि कोसळले.