| नागपूर | प्रतिनिधी |
नागपूरमधील एक कुटुंब उन्हाळी सुट्टीसाठी मनालीला गेले होते. पण त्यांची ही ट्रीप दु:खात बदलली आहे. कुटुंबातील एक मुलगी झिपलाइनिंग करताना 30 फूट खाली पडली. सुदैवाने जीव वाचला असून, पायाला अनेक ठिकाणी फ्रॅक्चर आहे. त्रिशा बीजवे असं जखमी मुलीचं नाव असून, ती खाली पडतानाचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल बिजवे हे उन्हाळी सुट्टीसाठी पत्नी आणि मुलगी त्रिशासोबत मनाली येथे गेले होते. रविवारी, 8 जून रोजी त्रिशा झिप लाइनरवर असताना अचानक त्याची केबल तुटली आणि त्रिशा 30 फूटावरून खाली पडली. त्रिशाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. झिप लाइनरला कमरेचा असलेला बेल्ट तुटल्याने तरुणी 30 फूट खाली पडली त्यामुळे पायाला अनेक फ्रॅक्चर झाले आहेत. सुरक्षेच्या अनुषंगाने तिथे कोणतीही व्यवस्था नव्हती, उपचारही वेळेत न दिल्याचा आरोप कुटुंबीयांने केला आहे. हा अपघात घडल्यानंतर तिला तातडीने मनाली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. पण तिथे तिच्यावर उपचार होऊ शकले नाहीत. यानंतर तिला चंदीगडला हलवण्यात आलं. इथं प्राथमिक उपचार घेतल्यानंतर आता मुलीला घेऊन तिचं कुटुंब नागपुरला आलं आहे. सध्या त्रिशावर नागपूरमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.






