दरोडेखोरांची माहिती देणार्‍याला 11 हजारांचे बक्षीस

| नेरळ | प्रतिनिधी |

भोईरवाडी येथे एका फार्म हाऊसवर 15 डिसेंबर रोजी दरोडा घालण्याचा प्रयत्न झाला होता. त्या गुन्ह्यातील कोणताही आरोपी अद्याप कर्जत पोलिसांच्या हाती लागला नाही आणि त्यामुळे कर्जत पोलिसांनी त्या दरोडेखोरांची माहिती देणार्‍यांना 11 हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे.

कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भोईरवाडी गावातील जननी फार्महाऊस असून, त्या फार्महाऊसमध्ये 15 डिसेंबर रोजी दरोडा घालण्याचा प्रयत्न झाला होता. ज्येष्ठ नागरिक पी.व्ही. सुब्रम्हण्यम यांचा जननी फार्महाऊस असून, त्या ठिकाणी त्यांची पत्नी आणि सासू असे एकत्र राहतात. त्यांच्या बंगल्यात 15 डिसेंबर रोजी रात्री काही अज्ञात लोक तोंडावर रुमाल बांधून आणि शस्त्रांसह फिरत असल्याचे आढळून आले होते. मध्यरात्री पाणी पिण्यासाठी उठलेले सुब्रह्मण्यम यांची चाहूल लागताच दरोडेखोर तेथून पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या सीसीटीव्ही कॅमेरे पाहिल्यावर हा प्रकार समाजाला होता. त्यावेळी दरोडा घालण्याचा अयशस्वी प्रयत्न सशस्त्र दरोडेखोर यांचा असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट होत होते. त्या गुन्ह्यात दाखल असलेल्या अज्ञात दरोडेखोरांना पकडण्यासाठी कर्जत पोलिसांनी एक महिना प्रयत्न केले आहेत. मात्र, अद्याप दरोडेखोर कर्जत पोलिसांच्या हाती लागले नाहीत.

त्यामुळे कर्जत पोलिसांनी दरोडेखोरांना पकडण्यासाठी मदत व्हावी म्हणून त्या दरोडेखोरांपर्यंत पोहचता यावे यासाठी नामी शक्कल लढविली आहे. बडे आसामी असलेलं सुब्रम्हण्यम यांच्या फार्म हाऊसमधील दरोडेखोरांना जेरबंद करण्यासाठी 11 हजारांचे बक्षीस लावले आहे.

Exit mobile version