| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात दोन ठिकाणी आणि शेजचा वांगणी गावात एकाच रात्री चोरी करण्याचे प्रकार घडले आहेत. त्या तिन्ही ठिकाणी चोरी करणारे चोरटे हे तेच असल्याचे त्या त्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजवरून दिसून येत आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणादेखील चक्रावून गेली आहे.

दोन जानेवारीच्या मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास शेलू गावातील व्हिजन कॉम्प्लेक्समध्ये तीन चोरटे हातात लोखंडी कट्यार आणि बॅटरीच्या प्रकाशात तेथे घुसले होते. त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन चोरटे हे इमारतीमध्ये फिरत असून, त्यांनी रूम नंबर 103 आणि 309 मध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, त्याच प्रकारचे वेशभूषा असलेले तीन चोरटे हे पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास शेलू गावापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या वांगणी गावातील एका ठिकाणी चोरी करताना आढळून आले. त्या ठिकाणी त्यांनी कपड्याच्या दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न केला. तेच तिघे पहाटे साडेपाच वाजता कर्जत तालुक्यातील डिकसळ येथे पोहचले होते. त्या ठिकाणी त्यांनी एका निवासी इमारतीत दोन ठिकाणी घरांचे टाळे फोडून चोरी करण्याचं प्रयत्न केला आहे. त्या बाबत नेरळ पोलीस ठाण्यात स्थानिक रहिवाशी यांनी तक्रार केली.

एकाच रात्री तीन वेगवेगळ्या ठिकाणी चोरी करण्याचे प्रयत्न केले जात असताना सीसीटीव्ही कॅमेरे असूनदेखील त्या चोरट्यांनी हिंमत होत असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.