आंबेत पुलाचे १२ कोटी पाण्यात

। आंबेत । गणेश म्हाप्रळकर ।
रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा सावित्री खाडीवरील आंबेत पुल हा गेल्या तीन वर्षांपासून दुरवस्थेत आहे. पुलाच्या खांबांची परिस्थिती कमकुवत असल्याचे लक्षात आल्यानंतरही गेले वर्षभर त्याची दुरुस्ती करण्यात आली नाही. गेले वर्षभर हा पुल दुरुस्तीच्या नावाखाली बंद ठेवण्यात आला. 12 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या पुलाचा वाहनचालकांना वापर करता येत नाही. त्यामुळे शासनाचे 12 कोटी रुपये पाण्यात गेले असल्याची टिका ग्रामस्थांनी केली आहे.

1978 साली बांधण्यात आलेल्या पुलाची तत्कालीन बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाहणी केली आणि सुमारे 12 कोटी या पुलाच्या दुरुस्तीच्या कामाकरिता मंजूर केले. मात्र 12 कोटी खर्च केलेला आंबेत सावित्री पूल चुकीच्या ऑडिट पद्धतीमुळे अद्याप गुलदस्त्यातच आहे. या गोष्टीचा सर्वसामान्य नागरिक तसेच प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय.

संरचना कंपनीला या कोट्यवधी रुपयांचा टेंडर देऊन ही दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र पुलाच्या सरकलेल्या खांबांची बाजू पाहता हा पुल अद्याप दुरुस्तीच्याच प्रतिक्षेत असल्याचे दिसून येते. त्यामुळे या पुलाचे तातडीने काम करण्यात यावे, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

प्रशासनाकडून याची नेहमीच दखल घेण्यात आली. मागील वर्षी पुलाची कमकुवत बाजू पाहता दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. मात्र कोणत्याच कंपनीने या कामाकरिता टेंडर भरला नसून हे काम रखडले आहे. आता सुरुवातीची टेंडर प्रोसेस बंद झाली असून नव्याने निघालेल्या टेंडर विषयी अनेक नामांकित कंपन्या याविषयी संपर्क करत आहेत. त्यामुळे लवकरच येत्या तीन ते चार महिन्यात हे काम मार्गी लागण्याची शक्यता आहे.

– उलागडे रावसाहेब, मुख्य कार्यकारी अभियंता, माणगाव
Exit mobile version