| पनवेल | वार्ताहर |
खारघर पोलिसांनी आपल्या हद्दीत केलेल्या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान खारघर परिसरात बेकायदेशीररित्या वास्तव्यास असलेल्या 12 परदेशी नागरिकांची धरपकड केली. यात दहा आफ्रिकन महिला तसेच दोन बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे. हे सर्व परदेशी नागरिक काही वर्षांपासून या ठिकाणी बेकायदेशीररित्या वास्तव्यास असल्याचे त्यांच्या चौकशीत आढळून आले आहे. पोलिसांनी या सर्व परदेशी नागरिकांना अटक करून त्यांना त्यांच्या मूळ देशात पाठविण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
नवी मुंबई पोलिसांनी वेगवेगळ्या भागांमध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगार व बेकायदेशीर कृत्य करणार्यांची धरपकड सुरू केली आहे. त्यानुसार खारघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले होते. या कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान खारघर सेक्टर-27 मधील रांजणपाडा भागातील मेट्रो रेसीडेन्सी या इमारतीत काही नायजेरियन नागरिक बेकायदेशीररीत्या राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी मेट्रो रेसीडेन्सी इमारतीतील एका फ्लॅटवर छापा मारला असता, सदर फ्लॅटमध्ये 10 आफ्रिकन महिला राहात असल्याचे आढळून आले. तसेच सेक्टर 18 मध्ये गस्त घालत असताना बालाजी स्वीटसमोर काजल मुख्तार शेख (36) व नुर इस्लाम लतीफ शेख (42) हे दोन व्यक्ती संशयास्पदरित्या आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांच्याकडे भारतातील वास्तव्याबाबतचे तसेच पासपोर्ट व व्हिसा आदी कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी बांग्लादेशी नागरिक असल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.