। नागपूर । प्रतिनिधी ।
महानिर्मितीच्या 2190 मेगावॅट क्षमतेच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्र आणि 1340 मेगावॅट क्षमतेच्या खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राने नुकतेच मध्य भारतातील सुप्रसिद्ध अशा विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थान (व्ही.एन.आय.टी.) नागपूर येथे पदव्युत्तर आणि पदवी शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना संशोधन सहाय्यक म्हणून सहभागी करून घेतले. त्याबाबतचा सामंजस्य करारावर (एम.ओ.यु.) स्वाक्षर्या केल्या.
यावेळी व्ही.एन.आय.टी.तर्फे संचालक प्रमोद पडोळे, डीन संशोधन व सल्लागार माधुरी चौधरी, मेकॅनिकल विभाग प्रमुख ठोंबरे, इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख विजय बोरघाटे तर महानिर्मितीच्या कोराडी वीज केंद्राचे मुख्य अभियंता अभय हरणे, खापरखेडा वीज केंद्र मुख्य अभियंता राजू घुगे, उप महाव्यवस्थापक(मासं) डॉ.प्रकाश प्रभावत, कार्यकारी अभियंता विजय अढाव, जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते, उप कार्यकारी अभियंता प्रवीण बुटे, धनंजय दाणी प्रामुख्याने उपस्थित होते.
अत्याधुनिक तंत्रज्ञानात तरुण पिढी अग्रेसर असल्याने अभियांत्रिकी शिक्षण घेणार्या तरुणांसाठी ही सुवर्ण संधी आहे. यामध्ये, पदव्युत्तर शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना एक वर्ष प्रतिमाह 25 हजार रुपये प्रशिक्षण भत्ता तर पदवी शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना तीन महिने प्रतिमाह 20 हजार रुपये प्रशिक्षण भत्ता देण्यात येणार आहे.