| चिरनेर | वार्ताहर |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावीची परीक्षा चिरनेर येथील पी.पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीच्या विद्या संकुलनाच्या परीक्षा केंद्रात सुरू झाली. इंग्रजी भाषेचा पहिलाच पेपर असल्याने यावेळी पालकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
बारावीच्या परीक्षेसाठी चिरनेर केंद्रात बुधवारी पहिल्याच दिवशी असलेल्या इंग्रजीच्या पेपरसाठी चिरनेर, दिघोडे, पिरकोन, आवरे येथील जुनिअर कॉलेजचे बारावीचे विद्यार्थी या चिरनेर केंद्रात दाखल झाले. 17 ब्लॉक मधून 420 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले असल्याची माहिती प्राचार्य तथा परीक्षा केंद्र प्रमुख सुरदास राऊत आणि पर्यवेक्षक व केंद्र संचालक आनंद चिर्लेकर यांनी यावेळी दिली. दरम्यान परीक्षा अतिशय शांततेच्या वातावरणात सुरू झाली असून, पुढील पेपरही कोणताही अनुचित प्रकार न घडता सुरळीतपणे पार पडतील अशी माहिती पी.पी. खारपाटील एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंगशेठ खारपाटील व उपाध्यक्ष राजेंद्रशेठ खारपाटील यांनी दिली.