माथेरानमध्ये 14 माजी नगराध्यक्षांचा सन्मान

| माथेरान | वार्ताहर |

माथेरानमधील क्रिकेट जगतात अग्रगण्य असलेल्या मुक्कदर समितीकडून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नागरिकांचा सन्मान करण्यात येतो. या वर्षी स्थानिक पातळीवर नेतृत्व करून माथेरानला विकासाच्या वळणावर नेणाऱ्या 14 माजी नगराध्यक्षांचा यथोचित सन्मान करण्यात आला. याशिवाय शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचाही गौरव केला आहे.

मुक्कदर क्रिकेट संघ आणि मुक्कदर समितीच्या संयुक्त विद्यमाने माथेरानमध्ये नुकतेच क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ हुतात्मा भाई कोतवाल क्रीडा संकुलात संपन्न झाला. या वेळी 14 माजी नगराध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. यात मनोज खेडकर व दिव्या डोईफोडे यांनी स्वतः उपस्थित राहून सन्मान स्वीकारला तर, वंदना शिंदे, प्रदीप दिवाडकर, गौतम गायकवाड, दिलीप गुप्ता, अजय सावंत यांच्या नातेवाईकांनी सन्मान स्वीकारला. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे शिक्षक योगेश जाधव, अश्वपाल संघटनेच्या अध्यक्षा आशा कदम यांनाही या वेळी सन्मानित करण्यात आले. क्रिकेट स्पर्धेत विक्रांत संघाने बाजी मारली तर उपविजेते पद यजमान मुक्कदर संघाला मिळाले.

Exit mobile version